नागपूर जिल्ह्यात ४४ हजारावर कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:41 AM2020-08-14T00:41:33+5:302020-08-14T00:42:42+5:30

जिल्ह्यात (ग्रामीण भागात) आतापर्यंत ४४ हजारावर कोरोनाच्या तपासण्या करण्यात आल्या असून, यात २७,०४५ अ‍ॅन्टीजेन टेस्ट तर १७,८९८ आरटीपीसीआर टेस्ट आहेत. यापैकी ३,३७५ कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Corona inspection on 44,000 in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात ४४ हजारावर कोरोना तपासणी

नागपूर जिल्ह्यात ४४ हजारावर कोरोना तपासणी

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी ठाकरे यांचे आवाहन : घाबरू नका तपासणी करून घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात (ग्रामीण भागात) आतापर्यंत ४४ हजारावर कोरोनाच्या तपासण्या करण्यात आल्या असून, यात २७,०४५ अ‍ॅन्टीजेन टेस्ट तर १७,८९८ आरटीपीसीआर टेस्ट आहेत. यापैकी ३,३७५ कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी आजवर ७२ वर मृत्यू झाले आहेत. परंतु या मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे वेळीच निदान न होणे, उशिरा तपासणी करणे आदी कारणांमुळे झाले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीस जर कोविड-१९ ची लक्षणे दिसून येत असल्यास त्यांनी घाबरून न जाता तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी गुरुवारी केले.
ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. ग्रामीण भागामध्ये निरंतर सर्वे सुरू आहे. तीन स्तरावर पथक तैनात करण्यात आले आहे. ६० ते ७० घरामागे एक कर्मचारी तैनात आहे. आठ हजारावर लोक या कामात आहेत. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ८५० सुपरवायझर आहेत. या माध्यमातून लक्षणे असलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची रॅपिड अ‍ॅन्टिजेन तपासणी केली जात आहे. त्यातूनही तपासणी वाढल्या आहेत. दररोज वरिष्ठ पातळीवर या सर्व कामांची मॉनिटरिंग होत आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे कामठी शहरामध्ये आढळून आले आहेत. पूर्वी येथे नागरिक प्रशासनाला साद देत नसल्यामुळे येथील रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर प्रशासनाने तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी, धर्मगुरू आदींना सोबत घेत जनतेला कोरोना तपासणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात प्रत्येक तालुक्याचा दौरा करून लोकप्रतिनिधी व स्थानिक डॉक्टरांना सोबत घेऊन लोकांना आवाहन केले जात आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी मिळून त्याचा विरोध करा
ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याबाबतचा चुकीचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अशा अफवा पसरविणाऱ्यांवर योग्य ती कारवाई होईलच; परंतु आपण सर्वांनी मिळून अशा अफवांचा विरोध करावा, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी ठाकरे आणि जि.प.चे सीईओ कुंभेजकर यांनी केले.

Web Title: Corona inspection on 44,000 in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.