लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यातील सर्व कारागृहात आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. राज्यातील अनेक कारागृहात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, खाण्यापिण्याच्या अत्यावश्यक सेवा बाहेरून आत येत असतात. त्याचमुळे कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असावा, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. कारागृहातील व्यवस्थेबाबत गृहमंत्र्यांनीच शंका उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.राज्यातील विविध कारागृहात ४११ कैदी पॉझिटिव्ह निघाले. त्याचप्रमाणे १६२ कारागृह अधिकारी, कर्मचाऱ्यांनासुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला. यात नागपूर कारागृहातील ४१ कैदी आणि ५६ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. येथील कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, गृहमंत्री देशमुख यांनी शनिवारी सायंकाळी मध्यवर्ती कारागृहात भेट दिली.त्यांच्यसोबत अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनीता शाहू उपस्थित होत्या. कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून कोरोनाबाधितांची संख्या आणि उपाययोजनांची माहिती जाणून घेतल्यानंतर, कारागृहात पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा व भोजन व्यवस्थेचा आढावा गृहमंत्र्यांनी घेतला. त्यानंतर स्थानिक कारागृह प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कारागृहात कोरोनाचा शिरकाव कसा झाला, या प्रश्नावर ते म्हणाले, कारागृहात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणूनच आम्ही खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या. राज्यातील नऊ कारागृह लॉकडाऊन करण्यात आले. कोणताही कैदी अथवा कारागृह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आतून बाहेर जाणार नाही किंवा बाहेरून आत येणार नाही, अशी व्यवस्था केली. मात्र, दूध, भाजीपाला यासारख्या आवश्यक सेवा बाहेरून आत घ्याव्याच लागतात. त्यातूनच कोरोनाचा शिरकाव झाला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. कारागृहात स्क्रीनिंग, मास्क, सॅनिटायझर, वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याबाबत आणखी खबरदारी घेण्यात येत असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले.
फिजिकल डिस्टन्सिंगकारागृहातील फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आतापर्यंत ११ हजार कैद्यांना बाहेर (जामिनावर) सोडण्यात आले आहे. त्यामुळे कारागृहात आता गर्दी नाही. नागपुरातील मध्यवर्ती कारागृहाची १८०० कैद्यांची क्षमता आहे. मात्र, येथे १७५० कैदीच आहेत, असे देशमुख म्हणाले. कैदी सोडल्यामुळे अनेक शहरात गुन्हेगारी वाढली, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी त्यावर बोलण्याचे टाळले.