नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत ‘कोरोना’चा संसर्ग पसरतो आहे. आतापर्यंत पाच अधिकारी व ८ कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. यामुळे विद्यापीठाचे कार्यालय ‘सील’ होण्याची शक्यता आहे. आश्चर्याची बाब म्हणजे धोका असतानादेखील कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची ‘कोरोना’ चाचणी झाली नसून यासंदर्भात आदेशदेखील जारी करण्यात आलेले नाहीत. विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने आतापर्यंत दोनच जण ‘पॉझिटिव्ह’ आले असल्याचा दावा केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या एका मोठ्या अधिकाऱ्याला ‘कोरोना’ झाल्यानंतर इतर दोन अधिकाऱ्यांनीदेखील चाचणी केली होती. ते ‘पॉझिटिव्ह’ आढळले होते व एका अधिकाऱ्याच्या पत्नीलादेखील संसर्ग झाला. कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनादेखील ‘कोरोना’ची लक्षणे जाणवली व त्यांच्या चाचणीचा अहवालदेखील ‘पॉझिटिव्ह’ आला. मुख्य प्रशासकीय कार्यालयात सर्व विभागांतून फायली येतात व अनेक टेबलवरून होत परत संबंधित विभागात जातात. विविध महाविद्यालये व शैक्षणिक विभागातील शिक्षक व कर्मचारीदेखील कार्यालयीन कामानिमित्त येतात.
अद्यापपर्यंत चाचणीचे निर्देश का नाहीत?
इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची ‘कोरोना’ चाचणी करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र असे झाले नाही व विद्यापीठाने कुठलेही निर्देशदेखील जारी केले नाहीत. जर जास्त संख्येत अधिकारी व कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ आले तर परिसर ‘सील’ करावा लागेल. या भीतीनेच चाचण्यांसाठी पुढाकार घेण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.