कोरोनाचा विदर्भाला धोका नाही : माफसूचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:23 PM2020-02-10T22:23:47+5:302020-02-10T22:24:34+5:30
विदर्भात तापमान जास्त असते व आर्द्रता कमी असते. त्यामुळे ‘कोरोना’चे विषाणू जास्त काळ टिकूच शकणार नाही. म्हणूनच विदर्भाला या आजाराचा धोका नाही, असा दावा ‘माफसू’चे (महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्यविज्ञान विद्यापीठ) कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चीनमध्ये थैमान घालत असलेल्या ‘कोरोना’ या आजाराचे विषाणू हे कमी तापमान व जास्त आर्द्रतेत वाढतात. परंतु विदर्भात तापमान जास्त असते व आर्द्रता कमी असते. त्यामुळे ‘कोरोना’चे विषाणू जास्त काळ टिकूच शकणार नाही. म्हणूनच विदर्भाला या आजाराचा धोका नाही, असा दावा ‘माफसू’चे (महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्यविज्ञान विद्यापीठ) कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर यांनी केला. ‘कोरोना’संदर्भात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
‘कोरोना’ आजाराबाबत ‘व्हॉट्सअॅप’सह विविध ‘सोशल मीडिया’वर विविध दावे करण्यात येत आहेत. परंतु हा विषाणू नेमका कुठून आला याबाबत अद्यापही ठोस संशोधन झालेले नाही. मात्र कुठलेही अन्नपदार्थ असतील तर त्यांना योग्य पद्धतीने शिजविणे आवश्यक आहे. आपल्या खाद्यसंस्कृतीत मसाल्यांचा जास्त वापर होतो. त्यामुळे यात विषाणू किंवा जीवाणू जिवंत राहूच शकत नाही. त्यामुळे मांसाहार केल्यानंतर ‘कोरोना’चा प्रसार होतो या अफवांवर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही, असे डॉ.पातुरकर यांनी सांगितले.
भारतात ‘कोरोना’ची केवळ तीनच प्रकरणे आढळून आली आहेत. परंतु या आजाराच्या नावाखाली राज्यभरातील विविध भागांत ‘कोरोना’बाबत भीती व गैरसमज पसरवले जात आहेत. यासंदर्भात ‘माफसू’कडून पुढाकार घेण्यात येईल. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व
महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमार्फत तसेच ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल. ‘कोरोना’बाबतचे तथ्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कुलसचिव चंद्रभान पराते यांच्यासह डॉ.सोमकुंवर, डॉ.व्ही.सी.इंगळे, डॉ.प्रभाकर टेंभुर्णे, डॉ.राजा दुधबळे प्रामुख्याने उपस्थित होते.