लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्हा परिषद मुख्यालयात पसरू नये. गर्दीवर नियंत्रण राहावे यासाठी जि.प. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. प्रशासनाने मुख्यालयातील इतर सर्व प्रवेशद्वार बंद केले असून, नवीन इमारतीतील मुख्य प्रवेशद्वार ये-जा करण्यासाठी सुरू ठेवण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिल्हा परिषदेने प्रवेशाचे इतर मार्ग बंद केले होते. त्यानंतर कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याने परिस्थिती पूर्ववत झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जि.प. प्रशासनाने आता पुन्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. दोन्ही जुन्या इमारतींमध्ये प्रवेश करण्यासाठी असलेले विविध प्रवेशद्वार बंद केले असून, केवळ नवीन इमारतीतील प्रवेशद्वारच मुख्यालयामध्ये ये-जा करण्यासाठी सुरू ठेवण्यात आले आहे.
कृषी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागात आढळले बाधित
यापूर्वी जिल्हा परिषदेचे ३० वर अधिकारी व कर्मचारी संक्रमित झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने आठ दिवस लॉकडाऊनही केले होते. आता पुन्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व कृषी विभागातील जवळपास ६ ते ७ कर्मचारी, अधिकारी संक्रमित झाले असल्याची माहिती आहे.
कोरोनामुळे महिला मेळावा रद्द
जिल्हा परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त जिल्हास्तरीय महिला मेळावा व आरोग्य शिबिराचे आयोजन २७ फेब्रुवारी रोजी पारशिवनी येथे करण्यात येणार होते. परंतु ७ मार्चपर्यंत सभा, कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला असल्याची माहिती जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी दिली.