कोरोना नियमांनी कळमना बाजारातील गर्दीचे व्यवस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:07 AM2021-03-16T04:07:49+5:302021-03-16T04:07:49+5:30
- लॉकडाऊन अगेन : टप्प्याटप्प्यात बाजाराला परवानगी - पहिल्याच दिवशी ८५ टक्के गर्दी ओसरली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...
- लॉकडाऊन अगेन : टप्प्याटप्प्यात बाजाराला परवानगी
- पहिल्याच दिवशी ८५ टक्के गर्दी ओसरली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रकोपाअंतर्गत सोमवारी लॉकडाऊन अगेनचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शिकेनुसार शेतकरी, अडते व ग्राहकांच्या गर्दीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात आले. पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत एकाच वेळी होणाऱ्या सर्व व्यवहारांना लगाम लावून, टप्प्याटप्प्यात परवानगी देण्यात आल्याने, लाॅकडाऊनही पाळले गेले आणि व्यवहारही सुरळीतपणे पार पडल्याचे चित्र कळमना बाजारात दिसून येत होते.
कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पहाटे ३ वाजेपासून दिवस सुरू होतो. वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आणि नजीकच्या गावांतून शेतकऱ्यांचा माल येथे पहाटेपासूनच उतरण्यास सुरुवात होतो. त्यामुळे सूर्योदयापूर्वीपासूनच येथे विक्रेते, शेतकरी, अडते, ग्राहक यांची तुंबळ गर्दी उसळत असते. दिवस उजाडताना संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या बाजारांतील व्यवहारांना चालना मिळते. मात्र, कोरोना संसर्गापासून बचाव करण्याच्या अनुषंगाने सोमवारपासून लागू झालेल्या टाळेबंदीत या सगळ्या बाजारांतील व्यवहारांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात आल्याने गर्दीचा प्रकोप तेवढा जाणवला नाही. बाजाराला अत्यावश्यक सेवेत ठेवण्यात आल्याने टाळेबंदीतही बाजार सुरू होता. त्याअनुषंगाने येथे दररोज होणाऱ्या गर्दीला लगाम लावण्यात प्रशासनाला यश आले. साधारणत: ८५ टक्के गर्दी टाळेबंदीच्या पहिल्याच दिवशी ओसल्याचे दिसून येत होते.
---------------
कृऊबासने केलेले वेळेचे व्यवस्थापन
* पहाटे ३ ते सकाळी ९ - भाजी बाजार
* सकाळी ९ ते दुपारी २ - बटाटे-कांदा बाजार
* दुपारी १२ ते संध्याकाळी ५ - धान्य बाजार
* आठवड्यात सोमवार - मिरची बाजार
----------------------
सोमवारी ३०-३५ गाड्याच उतरल्या
कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना येथे दररोज धान्य, भाज्या, मिरची आदींच्या २००-२२५ गाड्या उतरतात. टाळेबंदीमुळे सोमवारी केवळ ३०-३५ गाड्याच उतरल्याचे प्रशासनाकडून सांगितले गेले. शिवाय, बाजारात एका शेतकऱ्यासोबत इतरांना परवानगी नाकारण्यात आल्यानेही अनेकांनी येणे टाळले होते. अत्यावश्यक स्थितीतच प्रवेशाची परवानगी देण्यात येत होती. त्यामुळेही गर्दी टाळण्यात यश आले.
----------
मास्क हनुवटीलाच
गेल्या वर्षभरापासूनच कोरोनाच्या धास्तीने बाजारात मास्कशिवाय प्रवेश नाही, अशी सूचना देण्यात आली आहे. मात्र, अनेकजण मास्क जरूर घालतात; पण ते हनुवटीलाच चिकटलेले असते. त्यामुळे, मास्क घालण्याचा उपयोग काय, असा प्रश्न कायम आहे. सोमवारीही प्रशासनातर्फे गर्दी टाळा, व्यक्तिश: अंतर जपा, मास्क घाला आणि सॅनिटाझरची व्यवस्था अंमलात आणा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रारंभी नियम तंतोतंत पाळताना कामाच्या ओघात हे सगळे नियम विसरले जात असल्याचे दिसून येत होते.
-----------
एकच गेट सुरू
कळमना बाजारात प्रवेश करण्यासाठी मुख्य गेट सुरू ठेवण्यात आले होते. चिखलीकडील प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. शिवाय आतमध्ये प्रवेश करणाऱ्यांना दुचाकी व इतर वाहने बाहेर ठेवण्यास सांगितले जात होते. आपला माल द्वारावरूनच उचलून नेण्याची वेळ अनेकांवर आली.
.............