नागपुरात कोरोनाचे सावट; पण बाजारापेठांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 09:38 PM2020-10-16T21:38:49+5:302020-10-16T21:40:29+5:30
Navratra Festival, Corona Virus, Market Crowd यंदा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. राज्य शासनाने नवरात्रोत्सवासाठी कठोर नियमावली आणली आहे. त्यामुळे यावर्षी विविध संस्था आणि मंडळातर्फे गरबा-दांडियाचे आयोजन होणार नाही. कोरोनाचे सावट असतानाही बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. राज्य शासनाने नवरात्रोत्सवासाठी कठोर नियमावली आणली आहे. त्यामुळे यावर्षी विविध संस्था आणि मंडळातर्फे गरबा-दांडियाचे आयोजन होणार नाही. कोरोनाचे सावट असतानाही बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. लोक साध्या पद्धतीने उत्सव साजरा करणार असले तरीही घाघरा, आर्टिफिशियल ज्वेलरी, दांडियाची खरेदी सुरू च आहे. नवरात्रोत्सवात अतिरिक्त २० कोटींची होणारी उलाढाल यंदा ६ कोटींपर्यंत होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
धार्मिक कार्यक्रमांना एकत्र येण्यावर अजूनही निर्बंध असल्याने प्रथमच नवरात्रोत्सवात दांडिया-गरबाचे आयोजन होणार नाही. सामाजिक अंतर ठेवून आणि चेहऱ्यावर मास्क लावून सण नियमाच्या अधीन राहून साजरे करण्यावर भर देण्यात येणार आहे. बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहक कमी प्रमाणात येत आहेत. राज्य शासनाने उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना आणि नियम घालून दिल्याने तरुण-तरुणींच्या उत्साहावर विरजण पडले आहे. नऊ दिवसांच्या नऊ रंगाचा रंग फिका पडणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नऊ रंगाच्या कपड्यांची खरेदी थांबली आहे. कोरोनामुळे नवरात्रोत्सवाचे रंग फिके राहणार आहे.
मूर्तिकारांना आर्थिक फटका
घरगुती मूर्ती २ फूट तर सार्वजनिक मंडळाची मूर्ती ४ फूटच ठेवावी, असे निर्देश देण्यात आल्याने मूर्तिकारांना आर्थिक फटका बसणार आहे. याशिवाय अनेक मंडळानी नवरात्रोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मूर्त्यांची विक्री कमी होणार आहे. त्यामुळे ५ कोटींची उलाढाल २ कोटींवर येणार आहे.
घागरा आणि आर्टिफिशियल ज्वेलरी
नवरात्रोत्सवात तरुणींचा घागरा आणि तरुणांच्या वस्त्रांना जास्त मागणी असते. याशिवाय गुजरातमधून येणाऱ्या आर्टिफिशियल ज्वेलरीची २ कोटींची उलाढाल होते. यावर्षी व्यापाऱ्यांनी गुजरात आणि मुंबईहून घाघरा, आर्टिफिशियल ज्वेलरी आणि अन्य सजावटीच्या वस्तू मागविल्या नाहीत.
रोषणाई उद्योगावर परिणाम
मंडपाची सजावट होणार नसल्याचा फटका रोषणाई व्यावसायिकांना बसला आहे. नवरात्रोत्सवात जवळपास २ कोटींची उलाढाल होते. पण यंदा २० लाखांवर समाधान मानावे लागणार आहे. मंडपाची रोषणाई यंदा मंडळे करणार नाहीत. कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे व्यावसायिकांसमोर आव्हान आहे. यंदा सर्वच उत्सवावर कोरोनाचे संकट आल्याने रोषणाई करणारे व्यावसायिक आर्थिक संकटात आले आहेत.
फुलांची सजावट नाही, उत्पादक व विक्रेत्यांवर संकट
यंदा नवरात्रोत्सवात फुलांची सजावट राहणार नसल्याने फुल उत्पादक आणि विक्रेत्यांवर संकट येणार आहे. कोरोना काळात उत्पादकांना फूल शेतातच फेकावी लागली होती. पुढे परिस्थिती सुधारेल, असे वाटत असताना पुन्हा विक्रीवर बंधने आली आहे. नवरात्रोत्सव काळात नागपुरात नेताजी फुल मार्केटमध्ये दररोज १५ लाखांची उलाढाल होते. पण यंदा ही उलाढाल ५ लाखांची होण्याचे संकेत आहेत. पूजेची वगळता सजावटीच्या फुलांची विक्री होणार नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
असे नियम पाळावे लागणार
- गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये
- सार्वजनिक मंडळानी ऑनलाईन दर्शनाला प्राधान्य द्यावे
- देवीच्या आगमन, विसर्जन मिरवणुकीला बंदी
- माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेची जनजागृती
- आयोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करावे
- मंडळापात थर्मल स्क्रिंनिंग, निर्जतुकीकरणाची व्यवस्था
- मंडपात एकाचवेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्ते नको