नागपूर : आजच्या घडीला शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यावाढ व मृत्यू सारखेच होत आहे. शहरात कशीबशी आरोग्य यंत्रणा शाबूत आहे, पण ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील १४०० गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले होते. तशीच शिस्त आता गावकऱ्यांनी दाखविल्याशिवाय पर्याय नाही. बेफिकिरी केल्यास जीवघेणा कोरोना मोठा ब्लास्ट करू शकतो.
रुग्णांची संख्या भरमसाट वाढल्याने गावांची आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये चाचण्या होत आहेत. संक्रमण जास्त नसलेल्या रुग्णांना औषधी पुरविण्यात येत आहे. पण संक्रमण वाढलेल्या रुग्णांना थेट नागपूर गाठावे लागत आहे. शहरातही बेड्स उपलब्ध नसल्याने रुग्णांचा जीव भांड्यात अडकतो आहे.
- दृष्टिक्षेपात...
जिल्ह्यात एकूण रुग्ण - २९१०४३
ग्रामीणमध्ये एकूण रुग्ण - ६९६३३
ग्रामीणमधील गृह विलगीकरणातील रुग्ण - विभागाकडे आकडेवारी नाही
- कोरोनाचा लढा सुरू आहे विटॅमिनच्या गोळ्यांवर
पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून विटॅमिनच्या गोळ्या दिल्या जातात. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात व्हेंटिलेटर तर दूरच, ऑक्सिजनची देखील सोय नाही. एक्स-रे मशीन बंद आहे. रेडिओलॉजिस्ट नाही. रेमडेसिविर, फॅबिफ्लू यासारख्या औषधी ग्रामीण भागात मिळत नाहीत.
- मेयो, मेडिकलची भीती
ग्रामीण भागातील लोकांची धारणा आहे की, टेस्टिंग केल्यावर पॉझिटिव्ह आल्यानंतर मेडिकल, मेयो रुग्णालयात पाठविण्यात येते. तिथे गेलेला रुग्ण परत येत नाही, त्याची राखच येते. त्यामुळे टेस्टिंग न करता घरच्या घरी उपचार करीत आहेत. गावा-गावात मेयो, मेडिकलच्याबाबतीत दहशत निर्माण झाली आहे. घरी मरू, पण मेडिकलमध्ये जाणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांची आहे. तसे आरोग्य केंद्रात लिहूनही देत आहेत. त्याचबरोबर शहरात बेड्स उपलब्ध नसल्याने रुग्णांवर गावातच उपचार करावे लागत आहेत.
- आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांचा वॉच
ग्रामीण भागात खऱ्याअर्थाने काम करणारी यंत्रणा म्हणजे आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका होय. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन ही यंत्रणा त्यांचा दररोजचा हालहवाल घेत आहे. ग्रामीण भागातील अर्धी सरकारी यंत्रणा क्वारंटाईन आहे.
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाहीच
रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची टेस्ट केली जाते. या प्रक्रियेला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणतात, आरोग्य यंत्रणा अपुरी असल्याने तसे होत नाही. मुळात गामीण भागात अनेक लोक टेस्टच करीत नाहीत. काही सरकारी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खासगीमध्ये दुसऱ्यांदा टेस्ट करतात. त्यादरम्यान संपूर्ण गावाच्या संपर्कात येतात. गृह विलगीकरणात रुग्णाला ठेवल्यास छोटे छोटे घर असल्याने उद्देश साध्य होत नाही. कोविड केअर सेंटर्सची संख्या अपुरी आहे.
- ग्रामपंचायतीमध्ये फक्त शासकीय कर्मचारीच काम करीत आहेत. पोलीसपाटील तर घरूनच टपल्या मारते. लीडर फक्त लीडरकी करीत आहे. लोकांना नियम सांगायला गेलो, तर दोन गोष्टी आम्हालाच ऐकाव्या लागतात. कुणाला हटकले तर आम्हाला लाथा-बुक्क्या खाव्या लागतात. सरकारी कर्मचाऱ्याला ग्रामीण स्तरावर प्रोटेक्शनच नाही.
- हरिदास रानडे, जिल्हा कार्याध्यक्ष, ग्रामसेवक संघटना
- लोक सहकार्य करीत नाहीत. मास्क लावत नाहीत. घर सील करावे तर घराबाहेर पडतात. ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत. रुग्णालयात जायला तयार नाहीत, घरातच उपचार घेत आहेत. होळीनंतर मृत्यूच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. प्रशासनाचे ग्रामीण भागाकडे लक्ष नाही. लोकांवर वेळीच उपचार होत नसल्याने मरण डोळ्यापुढे आहे.
- शरद डोणेकर, माजी आरोग्य सभापती
- जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा हतबल
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अचानक वाढलेल्या रुग्णांमध्ये आरोग्य यंत्रणा सुद्धा हतबल झाली आहे. आम्ही उपलब्ध असलेल्या यंत्रणेवर लढा देत आहोत. पण आमच्याही मर्यादा आहेत. ही लाट थांबवायची असेल तर लोकांनी शिस्त पाळणे गरजेचे आहे, अशी भूमिका आरोग्य विभागाची आहे.