लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात गेल्या पंधरवड्यात दरररोज १६०० ते १७०० कोरोना संक्रमित आढळत होते. आता ही संख्या ८०० ते ९०० पर्यंत खाली आली आहे. संसर्गाचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे. चाचण्या कमी झाल्याने संक्रमण कमी झाले असेही म्हटले जात आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. आधी ५५ कोविड चाचणी केंद्रांवर मोफत तपासणी होत होती. त्यात आता १० मोबाईल टेस्टिंग युनिटची भर पडली आहे. शहरातील चाचण्या कमी झालेल्या नाहीत. चाचणी केंद्रावर तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली. तसेच आजार वाढल्यावर चाचणीसाठी येत असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.
‘लोकमत’शी चर्चा करताना आयुक्तांनी कोविड संक्रमण रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मृत्यूदर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी नागरिकांच्या सहकार्याचीही गरज आहे. अधिकाधिक लोकांनी चाचणी केली तर त्यांना वेळीच उपचार मिळतील. यातून मृत्यू नियंत्रणात आणण्याला मदत होईल. तसेच मृत्यूचे आकडे आधीच्या तुलनेत कमी झाले आहेत.घरातील एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास संबंधित कुटुंबातील सर्व सदस्यांनी, आजूबाजूच्या लोकांनी तपासणी केली पाहिजे. यातून संक्रमण रोखता येईल. अन्यथा प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. ६० वर्षावरील नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.एखाद्या कोविड संक्रमित व्यक्तीला काही समस्या आल्यास त्यांनी थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. झोन स्तरावर दखल घेतली जात नसेल तर यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष्य असल्याचे आयुक्तांनी सांगितले.८२० बेड खालीमेयो व मेडिकल रुग्णालयात सध्या २४० बेड खाली आहेत. खासगी रुगणालयात ५८० बेड खाली आहेत. वास्तविक नागपूर शहरात १० हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. परंतु यातील गंभीर रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. रुग्णांनी विशिष्ट रुग्णालयासाठी आग्रह करू नये. आॅक्सिजन पातळी कायम ठेवण्यासाठी आवश्यक सेवेची गरज असते. याची गरज भासताच रुग्णालयात दाखल व्हा, अधिक बिल आकारत असतील तर अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.दुप्पट होण्याचा कालावधी ३८ दिवसांवरनागपूर शहरात कोरोबाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ३८ दिवसांवर गेला आहे. आधी तो १५ दिवस होता. दोन महिन्यांनतर अशी परिस्थिती झाली आहे. तसेच मृत्यूदर ३.८ टक्के वरून कमी होऊन ३.४ पर्यंत खाली आला आहे. तो ३ च्या खाली आणावयाचा आहे. रिकव्हरी रेट ७९ टक्के झाला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.....कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी १० टीमकॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी १० टीम तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या एका संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १३ लोकांना ट्रेस केले जात आहे. तो वाढवून १:२० पर्यंत आणावयाचा आहे. घरोघरी सर्व्हे सुरू आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही. यंत्रणा कमी पडत आहे. अशी परिस्थिती अजिबात नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.