नागपुरात ‘टीम वर्क’मुळेच कोरोना नियंत्रणात : पोलीस आयुक्त उपाध्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 07:10 PM2020-05-28T19:10:45+5:302020-05-28T19:14:12+5:30
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात पोलीसही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागपूर पोलिसांनी महापालिका, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याने एक टीम वर्क म्हणून यात यश प्राप्त केले आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. कोरोनाच्या या लढाईत पोलिसांना साथ दिल्याबद्दल प्रशासन आणि नागरिकांचे त्यांनी आभारही मानले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात पोलीसही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागपूरपोलिसांनी महापालिका, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याने एक टीम वर्क म्हणून यात यश प्राप्त केले आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. कोरोनाच्या या लढाईत पोलिसांना साथ दिल्याबद्दल प्रशासन आणि नागरिकांचे त्यांनी आभारही मानले.
पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पोलिसांसह डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांसह नागरिकांचीही महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पोलिसांनी कोरोनाच्या नियंत्रणासाठी ‘टीम वर्क’ म्हणून काम केले. लॉकडाऊननंतर पोलीस रस्त्यांवर दिवसरात्र तैनात होते. रस्त्यावर सरकारचे धोरण व कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. सीपी ते पीसी (शिपाईपर्यंत) सर्वच रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. सव्वा दोन महिन्यांपासून पोलीस डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत. एका वेळी ६०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात असतात. पोलीस कर्मचारी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत ड्युटी बजावत आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये तर पोलिसांनी आपला जीव धोक्यात घातला आहे. तेथून कुणालाही बाहेर जाऊ दिले जात नाही आणि बाहेरच्या व्यक्तीलाही आत प्रवेश दिला जात नाही आहे. यामुळे कोरानाचा प्रादुर्भाव वाढलेला नाही. यात थोडीशीही चूक झाली असती तर परिस्थिती अतिशय गंभीर झाली असती. कंटेनमेंट झोनमध्ये काम करणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आले. शासकीय यंत्रणेत पोलीसच सर्वाधिक प्रभावित होत आहेत.
डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, कोविड संसर्गिक आणि संशयित लोकांना रुग्णालयात किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये ने-आण करण्यासाठी पोलिसांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. यादरम्यान अनेकदा संघर्षाचीही परिस्थिती निर्माण झाली. परंतु पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने शहरात कुठेही अप्रिय घटना घडली नाही. उलट पोलिसांनी समजावल्यानंतर विरोध करणारेही समर्थन करायला लागले. अनेक नागरिकांनी कोविड योद्धा बनून पोलिसांची मदत केली. धार्मिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांची मदत केली. यामुळे नागपुरात कोरोना मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात राहिला. या यशाचे श्रेय पोलिसांना देण्याच्या प्रश्नावर डॉ. उपाध्याय म्हणाले, पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. यशाचे श्रेय हे प्रत्येक कोरोना योद्ध्यास द्यायला हवे.