CoronaVirus in Nagpur : नागपुरात १४४ रुग्ण पॉझिटिव्ह, पाच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:46 PM2020-07-21T22:46:07+5:302020-07-21T22:47:13+5:30
कोरोनाचा विळखा जिल्ह्यात घट्ट होऊ पाहत आहे. जुलै महिन्यात पाचव्यांदा रोजच्या रुग्णसंख्येने शंभरी गाठली, तर गेल्या नऊ दिवसांपासून मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी १४४ रुग्ण पॉझिटिव्ह व पाच मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ३,१७१ झाली असून मृतांची संख्या ६० वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा विळखा जिल्ह्यात घट्ट होऊ पाहत आहे. जुलै महिन्यात पाचव्यांदा रोजच्या रुग्णसंख्येने शंभरी गाठली, तर गेल्या नऊ दिवसांपासून मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी १४४ रुग्ण पॉझिटिव्ह व पाच मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ३,१७१ झाली असून मृतांची संख्या ६० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, शासकीय प्रयोगशाळेच्या तुलनेत आज खासगी लॅबमधून सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या चढत्या आलेखावर आरोग्य क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. मेयोच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये २६, मेडिकलच्या प्रयोगशाळेत दोन, एम्सच्या प्रयोगशाळेत ३५, नीरीच्या प्रयोगशाळेत २९, खासगी प्रयोगशाळेत ४९, रॅपिड अॅण्टिजेन चाचणीत तीन असे एकूण १४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. खासगी लॅबमध्ये वाढत असलेले रुग्ण आरोग्य यंत्रणेचे काम वाढविणारे ठरणार आहे. सध्या मेयोमध्ये २२९, मेडिकलमध्ये २४९, एम्समध्ये ५०, कामठी रुग्णालयात २२, खासगी हॉस्पिटलमध्ये २८, आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये ३२७, मध्यवर्ती कारागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये १२४ या शिवाय, १०३ रुग्ण भरतीच्या प्रक्रियेत असल्याने एकूण १,१३२ रुग्ण उपचार घेत आहेत. आज ४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १९८१ झाली आहे. आज मृत्यूची नोंद झालेल्यांमध्ये कामठी येथील ५१ वर्षीय पुरुष, कन्हान येथील ४५ वर्षीय पुरुष, त्रिमूर्तीनगर येथील ४० वर्षीय पुरुष, नंदनवन येथील एक पुरुष तर एकाचा मृत्यू रविवारी झाल्यानंतर आज त्याची नोंद घेण्यात आली.
कामठी तालुक्यात २७ पॉझिटिव्ह
कामठी तालुक्यात २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या २३१ झाली असून येथील ६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सावनेर तालुक्यातील डफई येथील ३२ वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. पाटणसावंगीत पाच वेकोलि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. बुटीबोरी परिसरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले.हे दोघेही नागपूर येथील कॅन्सर रुग्णालयात कर्मचारी म्हणून कामाला आहेत. बुटीबोरीतील कोरोनाबाधितांची संख्या आता सातवर गेली आहे. वाडीतील तीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या २४ झाली आहे. सावनेर तालुक्यातील खापा येथे सैनिकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोराडीत चार रुग्णांची भर पडली. नागपूर ग्रामीणमध्ये आज ४३ रुग्णांची नोंद झाली आहे.
संशयित : ३,१३२
बाधित रुग्ण : ३,१७१
घरी सोडलेले : १,९८१
उपचार घेत असलेले रुग्ण : १,१३२
मृत्यू : ६०