CoronaVirus in Nagpur : नागपुरात चार दिवसात २२२ रुग्ण,४६ नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:01 PM2020-07-04T23:01:16+5:302020-07-04T23:02:57+5:30
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मागील चार दिवसात २२२ रुग्णांची नोंद झाली. साडेतीन महिन्याच्या कालावधीतील ही सर्वात मोठी संख्या आहे. यात शनिवारी ४६ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १७२७ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मागील चार दिवसात २२२ रुग्णांची नोंद झाली. साडेतीन महिन्याच्या कालावधीतील ही सर्वात मोठी संख्या आहे. यात शनिवारी ४६ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १७२७ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, क्वारंटाईन असलेलेच संशयित रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने आरोग्य यंत्रणेला काहिसा दिलासा मिळाला आहे. मध्यवर्ती कारागृहातील सात रुग्णांची पुन्हा शनिवारी नोंद झाली. येथील रुग्णांची संख्या १०३ झाली आहे. शुक्रवारी ४२ बंदिवान पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये एक बंदिवान, दोन कारागृहातील कर्मचारी व चार त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक आहेत. कोरोनाबाधित अधिकारी, नातेवाईक, कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांवर मेयो, मेडिकल व एम्समध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारपर्यंत बंदिवानांना कारागृहातीलच हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. शनिवारी या सर्वांना एक्स-रे, रक्ताची चाचणीसाठी मेयो व मेडिकलमध्ये पाठविण्यात आले.
कामठी, रामटेक, काटोलमध्ये रुग्ण
मेयोच्या प्रयोगशाळेत आज १७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात कारागृहातील सात, मिल्ट्री हॉस्पिटल कामठी येथील चार, रामटेक येथील तीन झिंगाबाई टाकळी येथील एक, रेल्वे अजनी क्वॉर्टसमधील एक तर एक रुग्ण काटोल येथील आहे. एम्समधून १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील सहा रुग्ण व्हीएनआयटी, सहा मॉरिस कॉलेज तर दोन रविभवन येथील क्वारंटाईन सेंटरमधील आहेत. नीरीच्या प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आलेले सहा रुग्ण पाचपावली क्वारंटाईन सेंटर येथील आहेत. माफसूच्या प्रयोगशाळेतून दोन, तर खासगी लॅबमधून सात रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
२४ रुग्णांना डिस्चार्ज
मेयोमधून बरे झालेल्या १० रुग्णांना सुटी देण्यात आली. हे रुग्ण कळमना, बुटीबोरी, मिनीमातानगर, मोमीनपुरा, टिमकी, वाठोडा, व हिंगणा येथील आहेत. मेडिकलमधून नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यात नाईक तलाव गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, चंद्रमणीनगर, अमरावती येथील रुग्ण आहेत. एम्समधून पाच रुग्णांना सुटी देण्यात आली, हे सर्व रुग्ण गणेशपेठ येथील आहेत. एकूण २४ रुग्णांना सुटी देण्यात आली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३३५ झाली आहे.
संशयित : १८२२
अहवाल प्राप्त : २६६१६
बाधित रुग्ण : १७२७
घरी सोडलेले : १३३५
मृत्यू : २५