CoronaVirus in Nagpur : नागपुरात १३ दिवसात ४३१ रुग्ण, ३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:21 PM2020-06-13T23:21:45+5:302020-06-13T23:23:33+5:30
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ मे रोजी ४०४ होती. २० दिवसामध्ये यात दुपटीने वाढ होऊन १० जून रोजी ८६३ वर पोहचली. गेल्या १३ दिवसात ४३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ मे रोजी ४०४ होती. २० दिवसामध्ये यात दुपटीने वाढ होऊन १० जून रोजी ८६३ वर पोहचली. गेल्या १३ दिवसात ४३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविणारी आहे. आज पुन्हा ३० रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या ९६९ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, एक भिकारी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील लोकांना हुडकून काढणे हे यंत्रणेसमोर आव्हान ठरणार आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात तांडापेठ व बिनाकी मंगळवारी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. हे दोन्ही रुग्ण मेयोतच भरती आहेत. याशिवाय, भानखेडा येथून एक तर अमरनगर हिंगणा येथून आठ रुग्ण आहेत. हे नऊ रुग्ण आमदार निवासाच्या क्वारंटाईन सेंटर येथे होते. पाचपावली पोलीस क्वॉर्टर क्वारंटाईन सेंटरमधील हिंगणा येथील एक, सीए रोडवरील निराश्रित तर एक चानकापूर खापरखेडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेत पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात टिमकी भानखेडा येथील दोन, इंदोरा चौक परिसरात दोन तर एक रुग्ण रिपब्लिकननगर इंदोरा येथील आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतून सात रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील पाच रुग्ण नाईक तलाव-बांगलादेश येथील तर दोन रुग्ण मंगळवारी पसिरातील आहेत. याशिवाय तीन रुग्ण खासगी प्रयोगशाळेतील आहेत. यात दोन अकोला येथील तर एक अमरावती येथील आहे. अकोल्यातील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हिंगण्यात नऊ तर खापरखेडा येथे एक रुग्ण
हिंगण्या तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील अमरनगर वसाहतीत आठ तर भीमनगर (इसासनी) येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. या तालुक्यात आतापर्यंत ३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, यातील गुमगाव येथील दोन रुग्ण सोडल्यास इतर सर्व रुग्ण एमआयडीसी परिसरातील आहेत. याशिवाय, खापरखेडा चानकापूर येथेही एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.
मंगळवारी, बुधवारी बाजारात फिरत होता भिकारी
शनिवारी मेयो रुग्णालयाच्या कोविड ओपीडीसमोर एक भिकारी बसून असल्याचे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्याची प्रकृती खालावली होती. रक्षकाने वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांना याची माहिती दिली. डॉ. पांडे यांनी त्याला भरती करून घेतले. त्याचे नमुने तपासले असता तो पॉझिटिव्ह आला. त्याच्याकडून माहिती घेतली असता मंगळवारी, बुधवारी बाजारात फिरून भीक मागत असल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात सीए रोडवरील एक भिकारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
३४ रुग्ण घरी परतले
३४ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. यात मेयोतील रुग्ण असून नालसाब चौक येथील एक, नाईक तलाव येथील चार, भानखेडा येथील तीन, मोमीनपुरा येथील दोन तर दहीबाजार येथील एका रुग्णाचा समावेश आहे. मेडिकलमधून १४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात टिमकी येथील एक, सतरंजीपुरा येथील दोन, भानखेडा येथील एक, गड्डीगोदाम येथील दोन, नाईक तलाव येथील सात, बजाजनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. एम्समधून सात रुग्णांना सुटी देण्यात आली. हे सातही रुग्ण नाईक तलाव, बांगलादेश येथील आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६०७ झाली आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १८१
दैनिक तपासणी नमुने ८६९
दैनिक निगेटिव्ह नमुने ८४२
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ९६९
नागपुरातील मृत्यू १६
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ६०७
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३,३८८
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २,३२४
पीडित - ९६९
दुरुस्त - ६०७
मृत्यू -१६