CoronaVirus in Nagpur : नागपुरात सारीच्या दोन रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 11:30 PM2020-06-06T23:30:24+5:302020-06-06T23:32:21+5:30
शुक्रवारी ५४ रुग्णांची नोंद झाली असताना शनिवारी १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांच्या संख्येत अचानक घट झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये एक ‘सारी’चा रुग्ण आहे. गोधनीमध्ये पहिल्यांदाच पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. या रुग्णासह कोरोनाबाधितांची संख्या ६९२ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये आज दोन ‘सारी’ रुग्णाचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी ५४ रुग्णांची नोंद झाली असताना शनिवारी १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांच्या संख्येत अचानक घट झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये एक ‘सारी’चा रुग्ण आहे. गोधनीमध्ये पहिल्यांदाच पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. या रुग्णासह कोरोनाबाधितांची संख्या ६९२ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये आज दोन ‘सारी’ रुग्णाचा मृत्यू झाला. यात दीड वर्षाचा चिमुकला असून दुसरा रुग्ण ४०वर्षीय पुरुष आहे. मार्च ते आतापर्यंत सारीच्या २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. बिडगाव येथील एक वर्षे सात महिन्याच्या बालकाला मेडिकलमध्ये आज सकाळी भरती केले. बालकाला ‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’(सारी) चा आजार होता. त्याची प्रकृती गंभीर होती. तातडीने उपचार करण्यात आले, परंतु दुपारी २.४५ वाजता त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाची कोविड तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली. कळमेश्वर येथील ‘सारी’चा दुसरा ४४ वर्षीय रुग्ण शनिवारी पहाटे ४.४० वाजता मेडिकलमध्ये भरती झाला. उपचार सुरू असतानाच दुपारी १२.३० वाजता मृत्यू झाला. या रुग्णाचीही कोविड तपासणी निगेटिव्ह आली. सध्या मेडिकलमध्ये सारीचे ८ रुग्ण उपचार घेत आहेत.
सारीचा एक रुग्ण पॉझिटिव्ह
परतवाडा येथून मेडिकलमध्ये ‘सारी’वरील उपचारासाठी भरती झालेल्या ६२ वर्षीय महिलेचा नमुना कोविड पॉझिटिव्ह आला. अमरावती येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यही पॉझिटिव्ह आले. हे तिन्ही रुग्ण सिम्बॉयसिस येथे क्वारंटाईन होते. सेमिनरी हिल्स येथील दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेली एक महिला शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर आज महिलेचा पती पॉझिटिव्ह आला. सिंधी रेल्वे येथे काम करणारा वर्धेतील एका कर्मचाऱ्याचा नमुना मेडिकलच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला. कळमेश्वर तालुक्यातील १४ मैल गावातील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, याच गावातील ५४ वर्षीय महिला सतरंजीपुरा येथे अंत्यसंस्काराला गेली असता ती पॉझिटिव्ह आली. आज तिचा ४० वर्षीय मुलगा व ३९ वर्षीय सूनही पॉझिटिव्ह आली. या शिवाय जुनी मंगळवारी येथूनही एका रुग्णाची नोंद झाली. मेयो व मेडिकलच्या प्रयोगशाळेतून नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
गोधनी रुग्णाचा तामिळनाडू प्रवासाचा इतिहास
गोधनी येथील साई श्रद्धानगर सोसायटी येथील रहिवासी असलेली एक व्यक्ती शुक्रवारी तामिळनाडू येथून घरी परतली. कुठलीही लक्षणे नसली तरी खबरदारी म्हणून एका खासगी प्रयोगशाळेत नमुना तपासला असता अहवाल पॉझिटिव्ह आला. गोधनीमध्ये पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाल्याने येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
२२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी
मेडिकलमधून दोन, एम्समधून पाच तर मेयोमधून १५ असे २२ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना सुटी देण्यात आली. यात मेडिकलमधील कसाबपुरा येथील १८ वर्षीय व ६० वर्षीय पुरुष आहे. मेयोतील नाईक तलाव, बांगलादेश येथील दोन, सैफीनगर येथील दोन, सीए रोडवरील चार, हंसापुरी येथील एक, गिट्टीखदान येथील एक, टांगा स्टॅण्ड येथील एक, मोमीनपुरा येथील एक, तर तिघे नागपूर जिल्हाबाहेरील आहेत. एम्समधून सुटी देण्यात आलेल्या पाच रुग्णांची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ९८
दैनिक तपासणी नमुने १९६
दैनिक निगेटिव्ह नमुने १८७
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ६९२
नागपुरातील मृत्यू १३
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ४४५
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३०२७
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १५८१
-पीडित-६९२-दुरुस्त-४४५-मृत्यू-१३