लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साडेतीन वर्षांच्या जुळ्या मुलांपासून दूर राहून जुलै महिन्यापासून ३३ वर्षीय परिचारिका मेडिकलच्या कोविड रुग्णसेवेत होत्या. सुरक्षेचा संपूर्ण नियमाचे पालन करीत होत्या. परंतु २८ सप्टेंबर रोजी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याच दरम्यान त्यांना डेंग्यूचीही लागण झाली. त्यांची प्रकृती खालावत गेली. एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. उच्चशिक्षित व मनमिळाऊ स्वभाव असलेल्या या परिचारिकेच्या आकस्मिक मृत्यूने मेडिकलच्या परिचारिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोविडच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. बालरोग विषयात एमएससी केलेल्या या परिचारिकेची जुलै महिन्यात कोविड वॉर्डात ड्युटी लागली. नंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही त्या कोरोनाबाधितांच्या सेवेत होत्या. प्राप्त माहितीनुसार, २८ सप्टेंबरला त्यांची ड्युटी संपल्यानंतर नियमानुसार त्यांनी कोरोनाची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. लक्षणे नसल्याने व इतर तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरीच उपचार घेण्यास सांगितले. पाचव्या दिवशी त्यांना ताप आला. त्यांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले. मानकापूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्या दाखल झाल्या. डेंग्यूची गंभीर लक्षणे त्यांच्यात दिसून आली. उपचार सुरू असतानाच ११ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
कोरोनाच्या लढ्यात डॉक्टरांसोबत खांद्याला खांदा लावून परिचारिका आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावित आहेत. काही उपचार घेऊन बरे होत आहेत तर काहींचा दुर्दैर्वी मृत्यू होत आहे. मेडिकलमधील कोरोना वॉरिअर्स परिचारिकेचा हा पहिला मृत्यू आहे. या परिचारिकेच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षाची मदत मिळण्याचा प्रस्ताव मेडिकल प्रशासन शासनाकडे लवकरच पाठविणार आहे. परंतु परिचारिकेच्या अचानक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.