लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. सलग सातव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली. शुक्रवारी ७५४ नव्या रुग्णांची भर पडली. मृतामंध्येही वाढ होऊन मृत्यूची संख्या ८ झाली आहे. यामुळे कोरोनाचा उच्चांक गाठलेल्या सप्टेंबर महिन्याच्या दिशेने नागपूर जिल्ह्याची वाटचाल होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. रुग्णांची एकूण संख्या १,४१,७८२, तर मृतांची संख्या ४२६१ वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. ११ फेब्रुवारी रोजी ५०० रुग्णांची नोंद झाल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी रुग्णसंख्येत घट येऊन ३१९ वर आली, परंतु १३ फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढतच आहे. त्या दिवशी ४८६, १४ फेब्रुवारी रोजी ४५५, १५ फेब्रुवारी रोजी ४९८, १६ फेब्रुवारी रोजी ५३५, १७ फेब्रुवारी रोजी ५९६, १८ फेब्रुवारी रोजी ६४४ व आज ७५४ झाल्याने घराघरांत पुन्हा भीती निर्माण झाली आहे. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून रोखले आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी अद्यापही नियंत्रणात नाही. यामुळे धोका वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पॉझिटिव्हिटीचा दर १२ टक्क्यांवर
शहर व ग्रामीण मिळून आज ४५७३ कोरोना संशयितांचे आरटीपीसीआर तर १५१३ रॅपिड अँटिजेन असे एकूण ६०८६ चाचण्या झाल्या. या चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर १२.३८ टक्क्यांवर गेला आहे. आरटीपीसीआरमध्ये ७०७ तर अँटिजेनमधून ४७ बाधित आढळून आले.
शहरात ६०३, ग्रामीणमध्ये १४८ रुग्ण
शहरात आज ६०३, ग्रामीणमध्ये १४८ तर जिल्हाबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरात ४, ग्रामीणमध्ये १, तर जिल्हाबाहेरील ३ मृत्यू आहेत. शहरात आतापर्यंत १,१३,०९२ रुग्ण व २,७६० मृत्यू, तर ग्रामीणमध्ये २७,७७० रुग्ण व ७६३ मृत्यूची नोंद झाली आहे.
बरे होण्याच्या दरातही घसरण
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्ण बरे होण्याचा दैनंदिन दरही घसरत चालला आहे. मागील शुक्रवारी (दि. १२) हे प्रमाण ९४.३० टक्क्यांवर होते. आठवड्याभरात आज १.२७ टक्क्याने घट होऊन ९३.०३ टक्क्यांवर आले. २३४ बाधित बरे झाल्याने आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १,३१,९०४ झाली. सध्या ५,६१७ रुग्ण उपचाराखाली आहेत. मागील दोन महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे.
दैनिक चाचण्या : ६,०८६
बाधित रुग्ण : १,४१,७८२
बरे झालेले : १,३१,९०४
उपचार घेत असलेले रुग्ण : ५,६१७
मृत्यू : ४,२६१