CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा प्रकोप, पुन्हा सात वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:26 PM2020-04-20T23:26:31+5:302020-04-20T23:27:19+5:30
सतरंजीपुरा संपर्कातील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी याच संपर्कातील सात रुग्णांची नोंद झाली आहे. यात तीन अल्पवयीन मुले व एका वृद्धाचा समावेश आहे. या रुग्णांसह नागपुरात रुग्णांची संख्या ८०वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सतरंजीपुरा संपर्कातील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी याच संपर्कातील सात रुग्णांची नोंद झाली आहे. यात तीन अल्पवयीन मुले व एका वृद्धाचा समावेश आहे. या रुग्णांसह नागपुरात रुग्णांची संख्या ८०वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात नागपुरात केवळ १६ रुग्णांची नोंद होती. परंतु एप्रिल महिन्याच्या २० तारखेपर्यंत ६४ रुग्णांचे निदान झाले आहे. ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकाकडून सतरंजीपुऱ्यातील मृत व त्याच्या नातेवाईकाकडून इतरांना लागण होणाऱ्याची संख्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. यांच्या संपर्कात आलेल्या १९९ संशयितांना संस्थात्मक अलगीकरणात दाखल करण्यात आले आहे. यातील ४४ संशयितांचे नमुने पॉझिटिव्ह तर ११ नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित १४४ संशयितांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. नागपुरात तीन प्रयोगशाळा आहेत. त्यांच्याकडे विदर्भातील इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नमुन्यांची संख्याही कमी झाली आहे. नागपुरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मोठ्या संख्येत नमुने तपासून रुग्णांच्या संपर्कातील लोकांना हुडकून काढणे गरजेचे आहे. -एम्स व मेयामध्ये एक तर मेडिकलच्या प्रयोगशाळेत पाच पॉझिटिव्ह मेडिकलच्या प्रयोगशाळेत ११ वर्षीय मुलगी, १० वर्षीय मुलगा, ३५ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष सर्व राहणार सतरंजीपुरा तर शांतिनगर येथील ६० वर्षीय महिलेचे नमुने कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. या सर्वांना आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आले होते. एम्सच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेला १३ वर्षीय मुलाचा नमुना पॉझिटिव्ह आला, तर मेयोच्या प्रयोगशाळेत लोणारा येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या सतरंजीपुऱ्यातील ५० वर्षीय रुग्णाचेही नमुने पॉझिटिव्ह आले. नागपुरात आतापर्यंत ८० रुग्णांची नोंद झाली असून, यातील १२ रुग्ण बरे तर एकाच्या मृत्यूची नोंद आहे. -२२७ मधून १८०नमुने निगेटिव्ह मेडिकलच्या प्रयोगशाळेत ९६ नमुने तपासण्यात आले. यात पाच नमुने पॉझिटिव्ह आले असून, ३४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नव्हता. उर्वरित ५७ नमुने निगेटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेत ४१ नमुने तपासले, यात यवतमाळ व नागपुरातील प्रत्येकी एक नमुना पॉझिटिव्ह आला. पाच नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. ३४ नमुने निगेटिव्ह आले. मेयोने २४ तासात ९० नमुने तपासले. यातील एक पॉझिटिव्ह सोडल्यास उर्वरित ८९नमुने निगेटिव्ह आले आहेत. -११ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह, आई-वडील चिंतित--सतरंजीपुऱ्यातील बाधितांच्या संपर्कात आलेल्या आई-वडिलांसह ११वर्षीय मुलीला चार दिवसापूर्वी आमदार निवासात संशयित म्हणून दाखल केले. त्याच दिवशी नमुने घेतले. मात्र आज मुलीचाच अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आई-वडिलांच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला नव्हता. मनपाचे आरोग्य पथक मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आले असताना दोघांनी विरोध केला. शेवटी मुलीसोबत आई जाईल, असा निर्णय घेण्यात आला. आता मुलगी आणि आई मेडिकलमध्ये तर वडील आमदार निवासात आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
- दैनिक संशयित ८३
- दैनिक तपासणी नमुने २२७
- दैनिक निगेटिव्ह नमुने १८०
- नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ८०
- नागपुरातील मृत्यू ०१
- डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण १२
- डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ११२०
- क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित ६२२