लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित बरे होण्याचा दर सातत्याने वाढतो आहे, तर गेल्या सात दिवसांपासून रुग्ण व मृत्यूदर स्थिर आहे आणि तो कमीही होतो आहे. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी जवळपास सहा हजारापर्यंत चाचण्यांची संख्या गेली असताना ३२४ बाधित आढळून आले, तर १३ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ९४,८९९ तर मृत्यूची संख्या ३११० झाली. आज ५०८ रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणाºया रुग्णांचा दर ९१.९५ टक्क्यांवर गेला आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. शहरात ६, ग्रामीणमध्ये ३ तर जिल्हाबाहेरील रुग्णाचा ४ मृत्यूची नोंद झाली. आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजेन या दोन्ही चाचण्या मिळून ५९४५ चाचण्या झाल्या. यातून शहरामध्ये २४७, ग्रामीणमध्ये ७३ तर जिल्हाबाहेर ४ रुग्णांचा समावेश आहे. चाचण्या वाढल्या असल्यातरी रुग्णसंख्या कमी झाली आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. ८७२५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ४५३० रुग्ण उपचाराखाली आहेत.
५६२१ रुग्ण निगेटिव्ह
आज शहर व ग्रामीण मिळून झालेल्या ५९४५ चाचण्यांमध्ये ५६२१ रुग्ण निगेटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेत १३१ चाचण्यांमध्ये १०९, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ४९८ चाचण्यांमध्ये ५०, माफसूच्या प्रयोगशाळेत ५६ चाचण्यांमध्ये ७, नीरीच्या प्रयोगशाळेत १३९ चाचण्यांमध्ये २६, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत १४६ चाचण्यांमध्ये ३३, खासगी लॅबमध्ये १८०५ चाचण्यांमधून १४१ रुग्ण निगेटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन चाचणीत १८६६ रुग्णही निगेटिव्ह आले आहेत.
मेडिकलमध्ये २१८ तर मेयोमध्ये ४५ रुग्ण
सप्टेंबर महिन्यात खासगीसह शासकीय रुग्णालयात खाटा मिळणे कठीण झाले होते. आता मात्र कुठे ६० तर कुठे ९० टक्के खाटा रिकाम्या आहेत. सध्या मेडिकलमध्ये कोरोनाचे २१८, मेयोमध्ये ४५ तर एम्समध्ये ३७ रुग्ण भरती आहेत. दहावर असे खासगी हॉस्पिटल आहेत जिथे कोरोनाची रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण नाही. पाचापावली कोविड केअर सेंटरमध्ये ३५ तर व्हीएनआयटी सेंटरमध्ये ८ रुग्ण आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ५९४५
बाधित रुग्ण : ९४,८९९
बरे झालेले : ८७२५९
उपचार घेत असलेले रुग्ण : ४५३०
मृत्यू : ३११०