लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच दिवसांपूर्वी ३६५ वर गेलेली काेराेना बाधितांची रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत असताना मंगळवारी पुन्हा वाढ होऊन ३५७ वर गेली. ७ रुग्णांचा मृत्यूही झाला. एकूण रुग्णांची संख्या १२३००६ तर मृतांची संख्या ३९१४ झाली आहे. विशेष म्हणजे, बाधितांच्या तुलनेत ४२८ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्यांचा दर ९३.७८ टक्क्यांवर गेला आहे.
सलग तीन दिवस चार हजाराखाली आलेली कोरोना चाचण्यांची संख्या आज ४२९९वर पोहचली. यात ३५४२ आरटीपीसीआर तर ७५७ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात ९२०२०९ चाचण्या झाल्या. चाचण्यांच्या तुलनेत १३.३६ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज बाधित रुग्णांमध्ये शहरातील २८८, ग्रामीणमधील ६६ तर जिल्ह्याबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहर व ग्रामीण भागातील २ तर जिल्हाबाहेरील तिघांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त माहितीत मागील अनेक महिन्यांपासून दैनंदिन जिल्हाबाहेरील रुग्ण व मृत्यूची संख्या सारखी राहत आहे. आज शासकीय प्रयोगशाळेमधून नीरीच्या प्रयोगशाळेत एकाही संशयित कोरोना रुग्णाच्या नमुन्याची तपासणी झाली नाही. शासकीय प्रयोगशाळेच्या तुलनेत सर्वाधिक तपासणी खासगी प्रयोगशाळांमध्ये झाली . १८६४ नमुन्यांची तपासणी केली. यातून १३२ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले.
शहरातील ९२ हजार रुग्ण झाले बरे
नागपूर जिल्ह्यात १ लाख १५ हजार ३५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यातील ९२ हजार ९८ रुग्ण शहरातील आहेत तर, २३२५६ रुग्ण ग्रामीण भागातील आहे. सध्या ३७३८ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील शहरातील २६७७ तर ग्रामीण भागातील १०६१ रुग्ण आहेत. १३०० रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांमध्ये भरती आहेत. २४३८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
आजची स्थिती
संशयित रुग्ण-४२९९
बाधित रुग्ण-१२३००६
बरे झालेले रुग्ण-११५३५४
मृत्यू-३९१४