लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची मृत्यूनंतरही अवहेलना थांबत नसल्याचे प्रकार सुरूच आहेत. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पुरुषाच्या जागी महिलेचा मृतदेह दिल्याने व मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्काराच्यावेळी ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. आपले माणूस गेल्याच्य दु:खात असलेल्या नातेवाईकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले. या प्रकरणात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची चूक असल्याचे हॉस्पिटलचे म्हणणे आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन सहा महिन्याचा कालावधी होत आहे. परंतु प्रशासनाने स्वत:कडून एकही कोविड हॉस्पिटल सुरू केले नाही. मेयो, मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलच्या प्रत्येकी ६०० खाटांवरच आजही ते अवलंबून आहेत. सध्या आॅक्सिजनच्या पुरवठ्याला घेऊन मेडिकलमध्ये रुग्ण भरती प्रक्रिया बंद आहे, तर मेयोमध्ये खाटा फुल्ल झाल्या आहेत. सामान्य व गरिबांसाठी नसलेले खासगी हॉस्पिटल व मनपाचे हॉस्पिटलमध्ये चक्क रुग्णसेवेला नकार दिला जात असल्याने कोरोनाबाधितांना उपचार मिळण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ येत आहे. बºयाच प्रयत्नानंतर खाट मिळत असली तरी यात बराच वेळ जात असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येऊन मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे. मात्र मृत्यूनंतरही अवहेलना थांबत नसल्याचे हे तिसरे-चौथे प्रकरण आहे.प्राप्त माहितीनुसार, काही दिवसापूर्वी ६२ वर्षीय पुरुष रुग्ण लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचारासाठी दाखल झाला. उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने याची माहिती महानगरपालिकेला दिली. मनपाची चमू आपले वाहन घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचली. त्यापूर्वी नातेवाईकाकडून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. याचवेळी ६१ वर्षीय महिलेचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी मनपाचेच एक वाहन तिथे उभे होते. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी वाहनात मृतदेह ठेवताना चूक केली. पुरुषाच्या मृतदेहावर मोक्षधाम घाटावर तर महिलेचा मृतदेहावर हिंगणा येथील घाटावर अंत्यसंस्कार होणार होते. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करीत असताना मृतदेह महिलेचा असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. या संतापजन्य प्रकाराची माहिती तात्काळ रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली. त्यांनी तातडीने वाहन पाठवून मृतदेह ताब्यात घेतला. हिंगणा येथील मृतदेहही बोलावून नंतर योग्य नातेवाईकाकडे सोपवला. कोरोनाच्या रुग्णावरील उपचारात हलगर्जीपणा तर होतोच आहे, मृत्यूनंतरही तो थांबत नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
-मृतदेहाची ओळख पटवूनच मृतदेहाचा ताबा दिलारुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या प्रत्येक मृतदेहाची ओळख पटवूनच नातेवाईकाना त्याचा ताबा दिला जातो. सोबतच मृतदेहाला टॅगही लावला जातो. या प्रकरणात मृतदेह ठेवताना मनपाच्या कर्मचाºयांकडून चूक झाल्याचे दिसून येते. हॉस्पिटलची यात कुठलीही चूक नाही.-डॉ. काजल मित्राअधिष्ठाता, लता मंगेशकर हॉस्पिटल