लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची सर्वसाधारण सभा २० जूनला सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना सोमवारी पत्र दिले होते. यावर आयुक्तांनी कोणताही निर्णय न देता महापौरांचे पत्र राज्य सरकारकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने परवानगी दिली तरच आयुक्त सभा घेण्याला हिरवी झेंडी देणार असल्याचे संकेत आहेत.महाराष्ट्र शासनाच्या ३ जूनच्या निर्णयानुसार व फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझेशन व्यवस्था करून, २०जूनला मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली आहे. यात शासन दिशानिर्देश व शासन आदेशाचा भंग होणार नाही, अशी ग्वाही या पत्रातून दिली आहे.महाराष्ट्र शासनाच्या ३ एप्रिलच्या आदेशात स्पष्ट नमूद आहे की, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि त्यांच्या विविध समितीच्या नियतकालीन सभेसंदर्भातील निर्णय त्यांच्या स्तरावर घेण्याचे नमूद केले आहे. शासन आदेशानुसार महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांशी मंगळवारी चर्चा करून २० जूनला सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सभेकरिता आवश्यक ती सर्व खबरदारी, तत्सम कार्यवाही करण्यात यावी, असे महापौरांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.यावर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले होते. परंतु त्यांनी यावर निर्णय न देता महापौरांचे पत्र राज्य सरकारकडे अभिप्रायासाठी पाठविले आहे. यासंदर्भात माहितीसाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.होकारानंतरही अत्यावश्यक कामासाठी निधी नाहीनगरसेवकांना प्रभागातील गडरलाईन, चेंबर व नाल्या दुरुस्तीच्या कामासाठी ३-३ लाखाचा निधी देण्याला १७ दिवसापूर्वी बैठकीत आयुक्तांनी होकार दिला होता. मात्र अद्याप कोणत्याही प्रभागाला निधी उपलब्ध झाला नाही. यामुळे अत्यावश्यक कामे ठप्प असल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी सांगितले. अशा समस्या मार्गी लागाव्यात यासाठी सभा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या परवानगीनंतरच मनपाची सभा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 8:57 PM