मनपाचा ३१ कोटीचा सिवरेज प्रकल्प : निविदा काढण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:17 PM2020-09-14T22:17:27+5:302020-09-14T22:18:34+5:30
शहरातील दहा झोनला विभाजित करून उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन सिवरेज झोन तयार करून ३१ कोटी ३० लाख २९ हजार ८६८ रुपयांच्या सिवरेज लाईन व चेंबर दुरुस्तीचा विस्तृत आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पांतर्गत तिन्ही सिवर झोनमधील मलनिस्सारण शेवटपर्यंत सुव्यवस्थित व सुरळीत होणार आहे. याबाबतच्या निविदा काढून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश सोमवारी देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील दहा झोनला विभाजित करून उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन सिवरेज झोन तयार करून ३१ कोटी ३० लाख २९ हजार ८६८ रुपयांच्या सिवरेज लाईन व चेंबर दुरुस्तीचा विस्तृत आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पांतर्गत तिन्ही सिवर झोनमधील मलनिस्सारण शेवटपर्यंत सुव्यवस्थित व सुरळीत होणार आहे. याबाबतच्या निविदा काढून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश सोमवारी देण्यात आले.
शहरातील सिवर लाईन व चेंबरच्या देखभाल कार्याबाबत महापौरांमार्फत स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या अध्यक्षतेत गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. नागपूर शहराची नॉर्थ (सतरंजीपुरा, आसीनगर, मंगळवारी), सेंट्रल (धरमपेठ, गांधीबाग, लकडगंज) आणि साऊथ (लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर) या तीन झोनमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. या तीनही झोनमधील सिवर लाईनच्या दुरुस्ती व देखभाल कार्यांतर्गत एकूण ६० किमीची पाईपलाईन बदलविण्यात येणार आहे, अशी माहिती पिंटू झलके यांनी दिली.
बैठकीत झलके यांच्यासह सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रभारी अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, प्रभारी कार्यकारी अभियंता (सांडपाणी व्यवस्थापन) राजेश दुफारे आदी उपस्थित होते. तीनही झोन अंतर्गत कामे मंजुरीनंतर रीतसर तीन स्वतंत्र निविदा बोलावून करण्यात येतील. नियुक्त केलेल्या कंत्राटदारांमार्फत अस्तित्वातील व नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या सिवरलाईन व चेंबर्सचे संपूर्ण नकाशे तयार करून घेण्यात येतील, अशी माहिती श्वेता बॅनर्जी यांनी दिली.
सिवर लाईनवरील अतिक्रमण काढा
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे येणार आहेत. अनेक ठिकाणी सिवर लाईनवर अतिक्रमण असल्याने ते अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करा, असे निर्देश पिंटू झलके यांनी दिले.
असा आहे सिवरेज आराखडा व खर्च
नॉर्थ झोन- १०.३५ कोटी
सेंट्रल झोन- ४.९८ कोटी
साऊथ झोन - १५.९५ कोटी
प्रकल्पातील कामे
- ६० किमीची सिवरेज लाईन बदलणे.
- २८.५६१ किमीच्या सिवरेज लाईनची दुरुस्ती
- शहरातील दहा झोनचे तीन भागात विभाजन.
- सिवरेज व चेंबरवरील अतिक्रमण काढणे.