प्रमुख पक्षांसह अपक्षही रिंगणात : १० जणांचे अर्ज नागपूर : महापालिका सभागृह गाजवल्यानंतर अनेक नगरसेवकांना आमदारकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत ते नशीब अजमावत आहेत. यात प्रमुख पक्षांसह अपक्ष नगरसेवकांचाही समावेश आहे. काँग्रेसचे तीन , राष्ट्रवादीचे चार, भाजप, मनसे व बसपाचे प्रत्येकी एक अशा १० नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केला आहे.भाजप-शिवसेना युती व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मोडीत निघाली. सर्वच पक्षातील इच्छुकांना निवडणुकीत संधी मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती.मनपातील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढविली होती. यावेळी ते पश्चिम विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. मनपा निवडणुकीत विकास ठाकरे ७,३७४ मते मिळवून विजयी झाले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा सामना आहे. आभा पांडे मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातून नशीब अजमावत आहेत. कामिल अन्सारी, प्रगती पाटील, दुनेश्वर पेठे, राजु नागुलवार आदी राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्याने राजू नागुलवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. प्रगती पाटील यांनी सिव्हिल लाईन प्रभागातून मनपा निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांनी पश्चिम नागपुरात आव्हान दिले आहे. मनपातील माजी गटनेते वेदप्रकाश आर्य पश्चिममधूनच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कामील अन्सारी यांनी यांनी मुस्लीमबहुल मोमिनपुरा प्रभागातून निवडणूक लढविली होती. त्यांनी ७ हजार ७३४ मते घेतली होती. त्यांनी या मतदारसंघात आमदार विकास कुंभारे, माजी मंत्री अनिस अहमद व सुधाकर देशमुख यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. म्हाळगीनगर प्रभागाचे नगरसेवक व जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांना भाजपने दक्षिण नागपुरातून रिंगणात उतरविले आहे. नगरसेविका सत्यभामा लोखंडे बसपाकडून आपले नशीब अजमावत आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी महापौर शेखर सावरबांधे यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. नाईक तलाव प्रभागातून मनसेच्या इंजिनवर श्रावण खापेकर बसले आहेत. (प्रतिनिधी)
आमदारकीच्या रिं ंगणात नगरसेवक
By admin | Published: September 30, 2014 12:34 AM