भ्रष्टाचारी समाजकल्याण अधिकारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:10 AM2021-01-16T04:10:14+5:302021-01-16T04:10:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - गतिमंद विद्यालयाच्या लिपिकाचे पद कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मान्यतेला पाठविण्यासाठी ५० हजारांची लाच मागणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गतिमंद विद्यालयाच्या लिपिकाचे पद कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मान्यतेला पाठविण्यासाठी ५० हजारांची लाच मागणाऱ्या भ्रष्टाचारी समाजकल्याण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. मकरसंक्रांतीच्या दिवशी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यावर एसीबीच्या कारवाईची संक्रांत आल्याने संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.
अनिल श्रावण वाळके (वय ५६) असे कारवाईत अडकलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचे नाव असून तो जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात (अतिरिक्त प्रभार) कार्यरत आहे. तक्रारदार (वय ४१) महादुला कोराडी येथील रहिवासी आहेत. ते झिंगाबाई टाकळी येथील गतिमंद मुलांच्या (विशेष) शाळेत कनिष्ठ लिपिक म्हणून मार्च २०१९ मध्ये अनुकंपा तत्वावर लागले होते. मार्च २०२० मध्ये त्यांचा प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण झाला. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीला कायमस्वरूपी मान्यता मिळावी म्हणून संस्थेने जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला. तो समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक आयुक्तांकडे मंजुरीसाठी जायला हवा. मात्र, समाजकल्याण अधिकाऱ्याने या प्रस्तावात विविध त्रुटी काढून तब्बल १३३ दिवसांनी तो संस्थेकडे परत पाठविला. संस्थेने त्रुटींची पूर्तता करून तो पुन्हा जिल्हा समाजकल्याण अधिकारी वाळकेकडे पाठविला. दरम्यान, तीव्र आर्थिक कोंडीत असलेल्या पीडित उमेदवाराने काही दिवसांपूर्वी वाळकेंची भेट घेतली. वाळकेंनी हा प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयात पाठविण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. मार्च २०२० पासून पगारच नसल्याने तीव्र आर्थिक अडचणीत असलेल्या फिर्यादींनी वाळकेंना आपली अडचण सांगितली असता त्याने ‘तुम्ही काहीही करा. ५० हजार रुपये दिल्याशिवाय प्रस्ताव पुढे जाणार नाही. अन्यथा परत त्रुटी काढून तो परत पाठवू्’, अशी धमकी दिली. त्यामुळे हतबल झालेल्या फिर्यादींनी जिल्हा परिषदेच्या बाजूलाच असलेले एसीबीचे कार्यालय गाठले. तेथे त्यांनी एसीबीच्या एसपी रश्मी नांदेडकर यांची भेट घेतली. फिर्यादीची तक्रारवजा कैफियत ऐकून घेतल्यानंतर नांदेडकर यांनी उपअधीक्षक संदीप जगताप यांना तक्रारीची शहानिशा करण्यास सांगितले. त्यानुसार, जगताप यांनी पंचाच्या साक्षीने व्हाईस रेकॉर्डिंगच्या माध्यमातून वाळकेंविरुद्धच्या तक्रारीची शहानिशा करून घेतली. ती खरी असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.
तडजोडीस नकार
त्यानंतर गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास तक्रारदार पुन्हा पंचासह वाळकेच्या कक्षात गेले. साहेब काही तडजोड (रक्कम कमी) करा, अशी त्यांनी आर्जव केली. यावेळी वाळकेने स्पष्ट नकार दिला. पाहिजे तर दोन टप्प्यात द्या, मात्र ५० हजारांपेक्षा एक रुपया कमी घेणार नाही आणि पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय प्रस्ताव पुढे पाठवणार नाही, असे ठणकावून सांगितले. ही बाब फिर्यादीने एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितली. नंतर पूर्ण रक्कम देण्याची तयारी दाखवत फिर्यादी वाळकेच्या कक्षात गेले. त्याच्याकडून लाचेचे ५० हजार घेतल्यानंतर वाळकेने ते आपल्या बॅगमध्ये ठेवले अन् लगेच प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविण्याची तयारी दाखवली. मात्र, फिर्यादीने इशारा केल्याने आजूबाजूलाच घुटमळत असलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आरोपी वाळकेला त्याच्या खुर्चीवरच पकडले. त्याच्याकडून लाचेच्या ५० हजारांच्या नोटाही जप्त करण्यात आल्या. वाळकेंविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर,अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप जगताप, हवालदार प्रवीण पडोळे, नायक प्रभाकर बेले, राहुल बारई आणि शारिक शेख यांनी ही कामगिरी बजावली.
---
जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागात भूकंप
वाळकेला ५० हजारांची लाच घेताना पकडण्यात आल्याचे वृत्त कळाल्याने जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागात भूकंप आल्यासारखे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी भेटीगाठीच रद्द केल्या. दरम्यान, एसीबीच्या पथकाने वाळकेच्या कक्षात तसेच त्याच्या मावशीच्या मनीषनगरातील निवासस्थानी झाडाझडती घेतली. वाळके मूळचा वर्धेचा असून, त्याने डिसेंबर २०२० मध्येच हा अतिरिक्त पदभार स्वीकारल्याचे समजते. एसीबीच्या एका पथकाने त्याच्या वर्धा येथील नालवाडीतील निवासस्थानीही झाडाझडती सुरू केली. त्यात काय मिळाले हे स्पष्ट झाले नाही.