लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईव्हीएम मशीनवर आता लोकांचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे हा विश्वास संपादित करण्यासाठी ईव्हीएमधून निघणाऱ्या व्हीव्हीपॅटचीही शंभर टक्के मोजणी करण्यात यावी, अन्यथा बॅलेटवरच निवडणुका घेण्यात याव्या, अशी मागणी भारत मुक्ती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी पक्षातर्फे देशभरात आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
ईव्हीएमद्वारे होणारी निवडणूक ही पारदर्शी नाही. त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात बामसेफतर्फे सातत्याने आंदोलन सुरू आहे. न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. बामसेफच्याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट मोजणीची आदेश दिले आहेत. परंतु त्याची १०० टक्के मोजणी होत नाही. त्यामुळे व्हीव्हीपॅटची १०० टक्के मोजणी करा अन्यथा ईव्हीएम हटवा या मागणीसाठी येत्या ३१ जानेवारी रोजी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर भारत मुक्ती मोर्चातर्फे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य न केल्यास ईव्हीएम फोडो आंदोलन केले जाणार आहे.
नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष सचिन वासनिक, अनिल नागरे, उत्तम सहारे, हेमलता पाटील, हस्ते मॅडम, अमर मेश्राम, भीमराव लांजेवार, जनार्दन गवई, लिंगायत सर, स्नेहा नारनवरे, निकोसे सर, भीमराव ढगे आदी सहभागी होते.