बाबासाहेबांच्या साहित्याची देशालाच गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:07 AM2020-12-08T04:07:23+5:302020-12-08T04:07:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य म्हणजे केवळ साहित्य नव्हे तर ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य म्हणजे केवळ साहित्य नव्हे तर ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शक दस्तऐवज आहे. त्यांच्या जीवनावर व त्यांच्या लेखन साहित्यावर देशातच नव्हे जगभरात संशोधन होत असते. त्यामुळे बाबासाहेबांच्या साहित्याला माेठी मागणी आहे. तेव्हा देशासाठीच आवश्यक असलेले हे दस्तऐवज लोकांपर्यंत पोहोचू द्या, साहित्य प्रकाशनाच्या कार्याला गती द्या, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.
राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीतर्फे गेल्या १६ वर्षांपासून बाबासाहेबांचा एकही नवीन खंड प्रकाशित करण्यात आला नाही, यावर प्रकाश टाकणारे वृत्त ‘बाबासाहेबांच्या साहित्याची राज्य सरकारलाच ॲलर्जी’ या शीर्षकांतर्गत
लोकमतने ६ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या वृत्ताची दखल घेत बाबासाहेबांच्या साहित्य प्रकाशनाला गती देण्याची मागणी केली असून यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा संकल्प केला आहे.
प्रकाशनाचे काम तातडीने सुरू व्हावे
बाबासाहेबांचे साहित्य हे कुण्या एका समाजापुरते मर्यादित नाही. ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ते साहित्य लोकांपर्यंत येणे आवश्यक आहे. सध्या समिती बरखास्त झाली असून समितीच्या सदस्यांची नेमणूक तातडीने व्हावी आणि कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे.
डॉ. प्रदीप आगलावे, आंबेडकरी विचारवंत
निधी कपात करण्याचा निषेध
बााबासाहेबांच्या साहित्यासाठी दरवर्षी ३ कोटी रुपयांचा निधी दिला जात असताना मागच्या सरकारने तो साडेचार लाखावर आणला. हे अतिशय चुकीचे काम झाले. मुळात साहित्य प्रकाशित होऊच नये, असाच हा प्रकार होय. आताच्या राज्य सरकारने तरी याावर गांभीर्याने लक्ष घालून प्रकाशनाचे काम सुरू करावे.
विलास गजघाटे, सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी
आंबेडकर फाऊंडेशनबाबतच्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी
बाबासाहेबांच्या साहित्याचा आवाका मोठा आहे. मूळ साहित्याचे ७५ खंड व संदर्भ साहित्याचे १०० असे एकूण १७५ खंड होऊ शकतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अनुवाद केल्यास ५०० खंडांचा प्रकल्प होऊ शकतो. एवढी व्याप्ती लक्षात घेऊन २ जुलै २००३ मध्ये चरित्र साधने समितीने आंबेडकर फाऊंडेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. हिवाळी अधिवेशनात २३ डिसेंबर २००९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या फाऊंडेशनचे मुख्यालय नागपुरात ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. याची पूर्तता व अंमलबजावणी करण्यात यावी.
प्रकाश बन्सोड
अध्यक्ष, भारतीय दलित पँथर