व्हीनस हॉस्पिटलमधील डॉक्टर दाम्पत्याने सव्वा कोटी हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 11:57 PM2021-07-23T23:57:19+5:302021-07-23T23:57:44+5:30

A couple of doctors fraud पाचपावलीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅनसह वेगवेगळी मशिनरीज लावून त्या बदल्यात महिन्याला लाखोंचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टर दाम्पत्य तसेच त्यांच्या साथीदारांनी तिघांना सव्वा कोटींचा गंडा घातला.

A couple of doctors from Venus Hospital fraud | व्हीनस हॉस्पिटलमधील डॉक्टर दाम्पत्याने सव्वा कोटी हडपले

व्हीनस हॉस्पिटलमधील डॉक्टर दाम्पत्याने सव्वा कोटी हडपले

googlenewsNext
ठळक मुद्देभागीदाराची तक्रार : पाचपावलीत गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पाचपावलीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅनसह वेगवेगळी मशिनरीज लावून त्या बदल्यात महिन्याला लाखोंचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टर दाम्पत्य तसेच त्यांच्या साथीदारांनी तिघांना सव्वा कोटींचा गंडा घातला. प्रकरणाच्या चाैकशीनंतर शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने डॉक्टर दाम्पत्यासह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

डॉ. राजेश तुळशीराम बघे (वय ४०), रश्मी राजेश बघे (वय ४२), दोघेही रा. आरटीओ कार्यालयाजवळ, म्हाडा कॉलनी), सतीश कालिदास मेश्राम (वय ५०, रा. जागृत नगर), योगेश पंढरीनाथ खंडारे (वय ५०, रा. वैशालीनगर), योगीराज रुस्तमजी वाघमारे (वय ४४, रा. कपिलनगर) आणि अविनाश वासुदेव खोब्रागडे (वय ४५, रा. मंगळवारी बाजार, सदर) अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी डॉ. बघे दाम्पत्य आणि त्यांच्या उपरोक्त साथीदारांनी एन. जी. पी. ॲग्रो बिल्ड कॉम, प्रा. लि. नावाने कंपनी उघडली आहे. त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या फार्मसी, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे, डायलेसिस आदी मशिनरीज चालविण्यासाठी अर्थसाहाय्य आणि मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. प्रफुल्ल भाऊरावजी वहादुडे (वय ४४, रा. श्रीनगर, एम्प्रेस मिल हाऊसिंग सोसायटी) यांची सेंट्रल स्कॅन नावाने फर्म आहे. आरोपींच्या एनपीजी ॲग्रो बिल्ड कॉम आणि वहादुडे यांची सेंट्रल स्कॅन फर्ममध्ये १० ऑगस्ट २०१८ ला व्यावसायिक करार करण्यात आला. त्यानुसार, वहादुडे यांनी पांच वर्षांसाठी २ कोटी, २५ लाख रुपये अनामत रक्कम म्हणून आरोपींकडे जमा करण्याचे ठरले. मासिक उत्पन्नाच्या माध्यमातून ४ लाख, ५० हजार रुपये प्रति महिना परतावा देण्याचे ठरले. त्यापेक्षा जास्त उत्पन्न झाल्यास त्यातील ५० - ५० टक्के नफा सारखा वाटून घेण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. आरोपींकडून लाखोंच्या मिळकतीची आकडेमोड करून दाखविली गेल्याने वहादुडे आणि त्यांचे भागीदार साैरव मेश्राम तसेच विलास नितनवरे यांनी १ कोटी, १८ लाख, २०, १०० रुपये चेकच्या माध्यमातून आरोपींना दिले. यावेळी आरोपींनी सिटीस्कॅन आणि एक्स-रे मशीन लावून दिली.

नुकसानच नुकसान, चेकही बाऊन्स

ठरल्याप्रमाणे आरोपींनी फार्मसी आणि सोनोग्राफी मशीन लावून दिली नाही. त्यामुळे फिर्यादींना मोठे नुकसान झाले. ते बघता त्यांनी आपली अनामत रक्कम आरोपींना परत मागितली. यावेळी आरोपींनी आपसी समेटपत्र तयार केले आणि सदर रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊन चेक दिले. मात्र, आरोपींच्या खात्यात रक्कम नसल्याने ते चेक बाऊन्स झाले. आरोपींनी जाणिवपूर्वक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात स्पष्ट झाल्याने या प्रकरणात पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Web Title: A couple of doctors from Venus Hospital fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.