कौटुंबिक भांडणात चढू नका न्यायालयाची पायरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:58 AM2018-12-04T10:58:51+5:302018-12-04T11:00:19+5:30

भांडणे सामंजस्याने व तडजोडीने संपविणे सर्वांच्या सोयीचे समजले जाते. ही संकल्पना राज्यामध्ये कौटुंबिक वाद निवारण केंद्राच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे. या केंद्रात समुपदेशन करून तुटलेली मने जोडली जाणार आहेत.

The Court's step not to climb into a family dispute | कौटुंबिक भांडणात चढू नका न्यायालयाची पायरी

कौटुंबिक भांडणात चढू नका न्यायालयाची पायरी

googlenewsNext
ठळक मुद्देनागपुरात वाद निवारण केंद्र समुपदेशन करून जोडली जातील मने

राकेश घानोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कौटुंबिक भांडणे सर्वाधिक संवेदनशील असतात. अशी भांडणे न्यायालयात गेल्यानंतर लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण भरडले जातात. त्यामुळे ही भांडणे सामंजस्याने व तडजोडीने संपविणे सर्वांच्या सोयीचे समजले जाते. ही संकल्पना राज्यामध्ये कौटुंबिक वाद निवारण केंद्राच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे. या केंद्रात समुपदेशन करून तुटलेली मने जोडली जाणार आहेत. त्यामुळे सामंजस्य व तडजोडीवर विश्वास असणाऱ्या दाम्पत्यांना आता कौटुंबिक वाद संपविण्यासाठी न्यायालयाची पायरी चढण्याची गरज नाही.
ही संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर राबविली जात आहे. सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे कौटुंबिक वाद निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. नागपूर कुटुंब न्यायालयामध्ये या केंद्रासाठी तीन वातानुकूलित खोल्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रात एकाचवेळी तीन दाम्पत्यांचे समुपदेशन करणे शक्य होणार आहे. समुपदेशनासाठी आठ विधिज्ञांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. गरजेनुसार मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. समुपदेशन यशस्वी झाल्यास संबंधित दाम्पत्याच्या सहमतीने अटी व शर्ती ठरवून त्यासंदर्भात लोक न्यायालयामार्फत आदेश जारी केला जाईल. त्या आदेशाविरुद्ध कुठेही अपील करता येणार नाही. त्यानंतर परत काही वाद झाल्यास संबंधित दाम्पत्याला अन्य उपलब्ध कायदेशीर मार्गाचा अवलंब करता येईल.
कौटुंबिक वाद न्यायालयात दाखल करण्यासाठी आधी वकिलाकडे जाणे आवश्यक असते. वकील आपली बाजू बळकट करण्यासाठी विरुद्ध पक्षावर विविध आरोप करतो. असे दोन्ही बाजूने घडते. बरेचदा वकिलांच्या चुकीच्या सल्ल्यांमुळे क्षुल्लक वाद विकोपाला पोहोचतात. अभिमानापोटी कुणीही माघार घ्यायला तयार होत नाही.
एकाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर दुसºया बाजूचे वरिष्ठ न्यायालयात धाव घेतात. अशाप्रकारे हे भांडण वर्षानुवर्षे सुरू राहते. शेवटी सर्वांना शारीरिक व मानसिक त्रास आणि मोठा खर्च सहन करावा लागतो.

व्यापक जनजागृती करू
कौटुंबिक वाद निवारण केंद्राला यश मिळण्यासाठी त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्याकरिता वृत्तपत्रे, रेडिओ, पोस्टर्स, शिबिरे इत्यादी माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाईल. नागरिकांना कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडविणे का गरजेचे आहे हे पटवून दिले जाईल.
- धनराज काळे, सचिव,
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.

Web Title: The Court's step not to climb into a family dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Familyपरिवार