नागपूर शहरात तीन ठिकाणी कोविड केअर सेंटर स्थापणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 07:34 PM2021-04-26T19:34:43+5:302021-04-26T19:40:03+5:30
Covid Care Centers कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णही नागपूर येथे हलविण्यात येत आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटर्सवर ताण येतो आहे. हीच बाब लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात तीन ठिकाणी कोविड केअर सेंटरची स्थापना होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णही नागपूर येथे हलविण्यात येत आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटर्सवर ताण येतो आहे. हीच बाब लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात तीन ठिकाणी कोविड केअर सेंटरची स्थापना होणार आहे.
सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता नागपुरात कोविड केअर सेंटरच्या संख्येत वाढ व्हावी ही मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात न्यायालयानेदेखील निर्देश दिले होते. त्यानुसार मनपाने तीन ठिकाणी कोविड केअर सेंटर स्थापन करण्यासाठी पावले उचलली आहेत. वाठोडा परिसरातील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथील रिक्रिएशन हॉल, गांधीबाग अग्रसेन चौक येथील अग्रसेन भवन तसेच रविनगर येथील अग्रसेन भवन येथे तात्पुरत्या स्वरूपातील कोविड केअर सेंटर उभारण्यात येईल. या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.
कामात वेग हवा
मनपाचे आतापर्यंतचे काम पाहता प्रशासकीय हलगर्जी व संथपणा दिसून आला आहे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढते आहे. अशा स्थितीत मनपाने नवीन कोविड केअर सेंटर स्थापन करण्यासाठी कामाला वेग देण्याची आवश्यकता असल्याचा सूर वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.