लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड पॉझिटिव्ह असतानाच्या काळासह कोविडमधून बरे झाल्यानंतरच्या काळातही आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोविडनंतर अनेकांना अनेक त्रास झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे बरे झाल्यानंतर आरोग्याची विशेष काळजी घ्या, असा सल्ला आयएमएच्या सहसचिव तथा मेयो रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सुषमा ठाकरे आणि कन्सल्टंट अॅनेस्थेशियोलॉजिस्ट अँड पेन फिजिशियन तथा मेयो व रुग्णालयाच्या बधिरीकरण विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. उमेश रामतानी यांनी दिला.महापालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कोविड संवाद' फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मंगळवारी सुषमा ठाकरे आणि उमेश रामतानी यांनी 'कोविडमधून बरे झाल्यानंतर घ्यावयाची काळजी' या विषयावर मार्गदर्शन केले. कोविडनंतर अनेकांना शारीरिक कमजोरी, सांधेदुखी, मांसपेशींमध्ये दुखणे, काहींचे फुफ्फुस बाधित झाल्याने श्वास घ्यायला त्रास होणे, रात्री झोप न येणे, झोपेतून उठून बसणे, नैराश्य, वैफल्याची भावना, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर आजारांचा शिरकाव, नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हृदयविकाराचा झटका, असे त्रास कोविडमधून बरे झालेल्यांना जाणवत आहेत. त्यामुळे यासाठी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या, करता येईल तेवढे सौम्य व्यायाम करा, भरपूर पाणी प्या, पाणी पिणे होत नसल्यास फळांचा रस, नारळपाणी आदींचे सेवन करा, असा सल्ला सुषमा ठाकरे आणि उमेश रामतानी यांनी दिला.कोविडची लक्षणे बदलत आहेतकोविडची लक्षणे दिवसेंदिवस बदलत आहेत. सुरूवातीला ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वास घ्यायला त्रास अशी लक्षणे कोविडबाधितांमध्ये दिसायची. आता चव जाणे, वास न येणे, छातीत दुखणे, हगवण, थकवा अशा लक्षणांसह बधिरता ही लक्षणेसुद्धा काही रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. रुग्णालयात किंवा गृह विलगीकरणाचा १७ दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पुन्हा कोविडची चाचणी करण्याची गरज नाही. हा काळ काळजी घेण्याचा आहे.बरे झाल्यावरही लक्षणेकोविडमधून बरे झाल्यानंतर अनेकांना महिनाभराने लक्षणे दिसून येतात तर अनेकांची लक्षणे तीन-तीन महिन्यांपर्यंत कायम असल्याचेही दिसून आले आहे. कोविडनंतर येणाऱ्या कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका त्यासाठी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहनही ठाकरे आणि रामतानी यांनी केले.