बालकांच्या सामाजिक तपासणीचा अहवाल कालमर्यादेत तयार करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:07 AM2021-07-17T04:07:28+5:302021-07-17T04:07:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड-१९ च्या संसर्गामुळे दोन्ही पालक किंवा एक पालक गमावलेल्या बालकांच्या सामाजिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ च्या संसर्गामुळे दोन्ही पालक किंवा एक पालक गमावलेल्या बालकांच्या सामाजिक तपासणीचे अहवाल कालमर्यादेत तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विमला आर. यांनी शुक्रवारी दिल्या.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, साधना हटवार, परीविक्षा अधिकारी धनंजय उभाळ, डॉ. दीपिका साकीरे, महापालिकेचे समाजकल्याण अधिकारी दिनकर उमरेडकर, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे अधीक्षक प्रकाश कांचनवार, चंदा खैरकर यावेळी उपस्थित होते.
बालकांची सामाजिक तपासणी करताना मनुष्यबळाची कमतरता पडणार नाही, याकडे गांभीर्याने लक्ष द्या. विभागातर्फे दोन्ही पालक मृत्यू झालेल्या बालकास पाच लाख रुपयाचे अर्थसाहाय्य तात्काळ देता येईल. तसेच एक पालक गमावलेल्या बालकास शासनाच्या योजनेचा लाभ देता येईल, असे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाने तपासणीच्या कामात तालुकास्तरावर सहकार्य करावे, दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या अनाथ प्रमाणपत्रासाठी तहसीलदार व पोलीस यंत्रणांची मदत घ्यावी. तसेच कोविड संसर्गामुळे एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शाळेच्या शुल्काबाबत शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. यासाठी बालकांच्या नातेवाईकाचे समुपदेशन करणे फार महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.
- कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या ४६
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या ४६ आहे. यापैकी १९ बालकांना अनुरक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. तीन बालकास आशा किरण बालगृहात तर एका बालकास त्याच्या नातेवाईकाकडे देण्यात आले. एक पालक गमावलेल्या बालकांचे १३७० अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती अपर्णा कोल्हे यांनी दिली. ३८१ बालकांचा सामाजिक तपासणी अहवाल तयार करण्यात आला असून, उर्वरित तपासणीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ संसर्गाने विधवा झालेल्या महिलांची एकूण ५९९ जणांची नोंद घेण्यात आली. विधिसेवा प्राधिकरणद्वारे ४२ पैकी ३६ बालकांना मदत करण्यात आली असल्याचे सदस्यांनी सांगितले.