मोकाट कुत्र्यांसाठी झोननिहाय ऑपरेशन सेंटर निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 09:24 PM2018-12-28T21:24:45+5:302018-12-28T21:26:24+5:30
शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या चावा घेण्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात झोननिहाय ऑपरेशन सेंटरची निर्मिती करण्याचे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनोज चापले यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या चावा घेण्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात झोननिहाय ऑपरेशन सेंटरची निर्मिती करण्याचे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनोज चापले यांनी दिले.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीची विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये सभापती मनोज चापले यांच्यासह समितीचे सदस्य प्रमोद कौरती, लखन येरवार, दिनेश यादव, सदस्या विशाखा बांते, वंदना चांदेकर, उपायुक्त राजेश मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, नोडल अधिकारी डॉ. सुनील घुरडे, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, डॉ. विजय जोशी, पीसीआयचे डॉ. प्रवीण कुमार यांच्यासह दहाही झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.
शहरात जवळपास ७५ हजारावर मोकाट कुत्र्यांची संख्या आहे. कुत्र्यांच्या चावा घेण्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या हैदोषामुळे नागरिकांमध्येही प्रचंड रोष आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये मोकाट कुत्र्यांना पकडून दुसरीकडे सोडताही येत नाही व त्यांना मारताही येत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेउन नागरिकांची सुरक्षा राखली जावी. मनपाच्या दहाही झोनमध्ये कुत्र्यांच्या नसबंदीसाठी प्रत्येकी एका ऑपरेशन सेंटर निर्माण करण्यात यावे, असे निर्देश चापले यांनी यावेळी दिले.
यंदा डेंग्यूच्या विळख्याने शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र पुढील वर्षी ही परिस्थिती ओढवू नये यासाठी मनपाने आधीपासूनच तयारीत असणे आवश्यक आहे. डेंग्यू डासांमुळे होत असल्याने आधी डासांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. मागील महिन्यात गांधीबाग झोनमधील मेयो रुग्णालय परिसरात सनराईज एंजीटेक प्रा.लि. कंपनीच्या डास पकडण्याच्या मशीनची चाचणी करण्यात आली. यामध्ये डासांच्या घनतेच्या अनुषंगाने १० टक्क्यापर्यंत डास मशीनद्वारे पकडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. शहरातील नागरिकांची डेंग्यूपासून सुरक्षा करण्याच्या दृष्टीने ही अत्याधुनिक मशीन खरेदी करून डासांची जास्त समस्या असलेल्या ठिकाणी लावण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
हत्तीरोगाच्या औषधासाठी जनजागृती करा
यावेळी पीसीआयचे डॉ. प्रवीण कुमार यांनी हत्तीरोग होण्याची कारणे, त्यावरील औषधोपचार यांची माहिती दिली. शासनाने हत्तीरोगावर प्रतिबंधात्मक आय.डी.ए. (आईवरमेक्टिन, डाईएथाइलकाबार्मॅजीन सायट्रेट, अल्बेडॉझाल) या तीन औषधांचा सात गोळ्यांचा डोज निर्धारित केला आहे. हत्तीरोगाला संपूर्णपणे हद्दपार करण्यासाठी हा डोज प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. मात्र यासाठी योग्य जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक त्या माध्यमांचा उपयोग व घरोघरी जाऊन औषध वितरीत करणाऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या मार्फत जनजागृती करण्याचे निर्देश चापले यांनी दिले.