ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात महिला अत्याचाराचे गुन्हे जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 11:25 AM2020-10-27T11:25:47+5:302020-10-27T11:27:43+5:30
Crime Nagpur News गेल्या ९ महिन्यात नागपुरात महिला अत्याचाराच्या एकूण ३५६ घटना घडल्या आहेत तर नागपूर जिल्ह्यात हा आकडा २६९ आहे.
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हाथरसच्या घटनेनंतर ठिकठिकाणच्या महिला अत्याचाराच्या घटनेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, बलात्कार, विनयभंग आणि हुंडाबळीच्या घटना सुद्धा चचेला आल्या आहेत. गेल्या ९ महिन्यात नागपुरात महिला अत्याचाराच्या एकूण ३५६ घटना घडल्या आहेत तर नागपूर जिल्ह्यात हा आकडा २६९ आहे. यावरून ग्रामीणच्या तुलनेत शहरातील गुन्हेगार जास्त निर्ढावलेले आहेत, हे यातून स्पष्ट होते.
कायदे कितीही कठोर केले तरी गुन्हेगारांची विकृती कमी व्हायला तयार नाही गुन्हेगारांच्या विकृतीचा ग्राफ सारखा वाढत असल्याचे सर्वत्र दिसून येते. त्याला अनेक कारणे असली तरी मोकाट सुटलेले गुन्हेगार महिलांना सॉफ्ट टार्गेट मानतात. बदनामीच्या धाकाने त्या पोलिसांत तक्रार करणार नाही, असे त्यांना वाटते. दुसरे म्हणजे, त्यांना कायद्याचा धाक वाटत नाही.
राजकीय घोषणा
महिला अत्याचाराची गंभीर घटना घडली की, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, आरोपींना तातडीने शिक्षा होईल, यासाठी अमुक करू, तमुक करू, नेते मंडळी अशा घोषणा करतात. मात्र तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे ते शक्य होत नाही. गुन्हेगारांना तातडीने आणि कठोर शिक्षा होत नसल्यामुळे ते जास्त निर्ढावतात.
महिला-मुलींच्या अत्याचाराच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये संवेदनशीलपणे आणि सहृदयतेने तपास करण्याचे आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल, असे भक्कम पुरावे गोळा करण्याबाबत सर्व पोलीस अधिका-यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
सुनील फुलारी
अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा, नागपूर)