पोलिसांवर गुन्हेगारांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:11 AM2021-05-05T04:11:12+5:302021-05-05T04:11:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गावठी दारूच्या भट्ट्या आणि जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गुन्हेगारांनी जोरदार हल्ला चढवला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गावठी दारूच्या भट्ट्या आणि जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गुन्हेगारांनी जोरदार हल्ला चढवला. तुफान दगडफेक करून
त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास रामटेकेनगर टोली भागात ही घटना घडली. त्यानंतर दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी धावला. परिस्थिती लक्षात घेऊन अनेक वरिष्ठांसह पोलीस आयुक्तांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. वृत्त लिहिस्तोवर टोली भागात प्रचंड तणावाची स्थिती होती.
रहाटे टोली, रामटेके नगर भागात असलेल्या एका झोपडपट्टीत जागोजागी हातभट्टीची दारू गाळली जाते. या भागात मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डेही चालतात. पोलीस त्या ठिकाणी वारंवार कारवाई करतात; मात्र त्याला न जुमानता हे गुन्हेगार पुन्हा काही दिवसांनी दारूच्या भट्ट्या आणि जुगार अड्डे सुरू करतात. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास पोलिसांचे पथक तिकडे कारवाईसाठी गेले. पोलीस कारवाई करीत असल्याचे बघून गुन्हेगारांनी महिला-मुलांना पुढे केले. त्यांच्या आडून त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. तुफान दगडफेक करून पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड केली. मोठ्या संख्येत गुन्हेगारांनी धाव घेतल्यामुळे पोलिसांची भंबेरी उडाली. त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती देऊन घटनास्थळी पोलीस ताफा मागवून घेतला. वरिष्ठांनाही कळविले. पोलिसांवर हल्ला झाल्याचे आणि घटनास्थळी प्रचंड तणाव असल्याचे कळल्यामुळे अजणीचे ठाणेदार विनोद चौधरी, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे तेथे पोहोचले. बिथरलेला जमाव दगडफेक करून पोलिसांच्या कारवाईला विरोध करत असल्याने आजूबाजूच्या सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस, बीट मार्शल, शीघ्र कृतीदल, दंगा नियंत्रण पथक बोलावून घेण्यात आले. त्यानंतर वरिष्ठांसह मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा तिकडे धावला. स्वतः पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही घटनास्थळ गाठले. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आरोपींची धरपकड सुरू केली. घरातील माणसं पोलीस पकडून नेत असल्याने घरातील महिला मुलांनी अक्षरशः लोटांगण घेऊन आक्रोश सुरु केला. आजूबाजूचे नागरिकही घटनास्थळी पोहोचले.
रात्री १०.१५ पर्यंत या भागात प्रचंड तणावाची स्थिती होती.
---
अनेक जण ताब्यात
रात्री १० वाजेपर्यंत १५ ते २० जणांना पोलीस ठाण्यात आणून बसविण्यात आले होते. त्यांच्याकडून हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात होता.
---