लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोहिणी व मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले असून, आर्द्रा नक्षत्रात जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. पेरणीयोग्य पाऊस न बरसल्याने सावनेर व हिंगणा तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये अद्यापही पेरणीला सुरुवात झाली नाही. सावनेर व हिंगणा तालुक्यात धूळ पेरणी करण्याची प्रथा असल्याने या दोन्ही तालुक्यातील पेरणी पूर्णपणे फसली असून, दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी ‘प्री मान्सून’ कपाशीची लागवड केली असून, ओलिताची सोय असल्याने पीक सुस्थितीत आहे.सावनेर तालुक्यात ४०,१११ हेक्टरपैकी १८,८७५ हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली. यात कपाशी व सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. हिंगणा तालुक्यात ३२ हजार हेक्टरपैकी १८ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. चार हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली. या दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांचा पावसाबाबतचा अंदाज चुकला आणि ते तोंडघशी पडले. या तालुक्यांमध्ये आर्द्रा नक्षत्रात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या असल्या तरी त्या पावसामुळे बियाणे उगवले नाही. उमरेड तालुक्यात केवळ ३० मि.मी. पावसाची नोंद झाली असताना शेतकऱ्यांनी २१ हजार हेक्टरपैकी १६ हजार हेक्टरमध्ये कपाशीची लागवड केली. शिवाय, १८ हजार हेक्टरपैकी सहा हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी आटोपण्यात आली. त्यातच पावसाने ऐनवेळी दडी मारल्याने ही संपूर्ण पेरणी फसली. काटोल, नरखेड, कळमेश्वर, पारशिवनी, भिवापूर व नागपूर (ग्रामीण) तालुक्यात काही शेतकऱ्यांनी पाऊस येईल, या आशेवर कपाशीची पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. रामटेक, कामठी, मौदा, कुही तालुक्यात शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीला सुरुवात केली नाही. विशेष म्हणजे, पावसाअभावी जिल्ह्यातील ८० टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात काही शेतकरी ‘प्री मान्सून’ कपाशीची मेच्या शेवटच्या आठवड्यात लागवड करतात. ही कपाशी जगविण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. सध्या शेतांमधील विहिरीत पाणी असल्याने तसेच तापमान थोडे कमी झाल्याने ही ‘प्री मान्सून’ कपाशी तग धरून आहे. परंतु, पाण्याची पातळी खालावत चालल्याने याही कपाशीला पावसाची प्रतीक्षा आहे.
पेरणीयोग्य पाऊस नाहीजिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या असल्या तरी तो पेरणीयोग्य पाऊस नाही, अशी माहिती पंचायत समितीच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. जोपर्यंत १०० मि.मी. पावसाची नोंद होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाच्या पेरणीला सुरुवात करू नये, असे आवाहन कामठीच्या तालुका कृषी अधिकारी मंजूषा राऊत यांच्यासह इतर तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
धानाची रोवणी रखडलीजिल्ह्यातील मौदा व रामटेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात तर पारशिवनी, कामठी व कुही तालुक्यात धानाचे काही प्रमाणात पीक घेतले जाते. सध्या पऱहे टाकून रोपे उगवायला हवी होती. मात्र पावसाने दडी मारल्याने पऱहे टाकण्याची प्रक्रिया लांबणीवर गेल्याने रोवणीला वेळ लागणार आहे. मौदा व रामटेक तालुक्यात काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर पऱहे टाकण्याचा प्रयोग केला. परंतु, प्रतिकूल वातावरणामुळे रोपांची व्यवस्थित वाढ होऊ शकली नाही. या तालुक्यांमधील विहिरी कोरड्या पडल्या असून, पेंच जलाशयात मृत जलसाठा शिल्लक असल्याने पऱहे जगविण्यासाठी तसेच रोवणी करण्यासाठी पाणी मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे धानासोबतच कापूस, सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता बळावली आहे.