-लोकमत विशेष
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनामुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी झाले असताना ‘बोन डेथ’ (अवॅस्क्युलर नेक्रोसिस) या आजाराने डोके वर काढल्याने चिंतेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, सध्या दिसून येणारे रुग्ण कोरोनाचा पहिल्या लाटेतील आहेत. दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या पाहता रुग्ण वाढण्याची भीती आहे. मेडिकलमध्ये आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनावर यशस्विरीत्या मात केलेले अनेक रुग्ण सध्या ‘लाँग कोविड’च्या लक्षणांनी त्रस्त आहेत. यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या अधिक आहे. आता या रोगाच्या रुग्णांची संख्या कमी झाली असताना ‘बोन डेथ’ नवीन आजाराने डोके वर काढले आहे. मेडिकलच्या अस्थिव्यंगोपचार विभागाचा ‘जॉईंट रिप्लेसमेंट’ या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा पहिल्या लाटे दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये हा आजार दिसून आला आहे. यामुळे पुढील सहा महिन्यानंतर या आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.
-काय आहे ‘बोन डेथ’?
मेडिकलच्या अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. मो. फैजल यांनी सांगितले, ‘अवॅस्क्युलर नेक्रोसिस’ या आजारात हाडांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत गाठ निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित होतो. परिणामी, त्या ठिकाणच्या पेशी मृत होतात. अनेकदा हाडांना तडे जातात. यामुळे हाडे तुटण्याचा धोका निर्माण होतो. मेडिकलमध्ये आढळून आलेल्या या आजारातील रुग्णांचे वय ४० ते ५५ वयोगटातील आहे.
- ‘स्टेरॉइड’ ठरतेय कारण
कोरोनाचा गंभीर रुग्णांवर ‘स्टेरॉइड’ उपचाराचा समावेश केला जातो. लांब कालावधीपर्यंत दिल्या जाणाऱ्या या उपचारामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. या शिवाय, हार्मोनचे प्रमाण वाढून रोगप्रतिकार शक्ती कमी होते. बोन टिश्शूची निर्मिती होण्यासच अडथळा निर्माण होतो.
- रुग्ण वाढण्याची शक्यता अधिक
डिसेंबर व जानेवारी महिन्यात पॉझिटिव्ह आलेले रुग्ण कोरोनामुक्त होऊन जवळपास सहा महिन्यानंतर आता ‘बोन डेथ’ची लक्षणे घेऊन येत आहेत. या लाटेत रुग्णांची संख्या फार कमी होती. परंतु दुसऱ्या लाटेत जून महिन्यापर्यंतच ३, ५३,२८५ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे रुग्णांत वाढ होण्याची भीती आहे.
-ही आहेत लक्षणे
:: दोन्ही किंवा एका जांघेत दुखणे.
:: माडी घालून बसणे अवघड जाणे
:: इंडियन टॉयलेटवर बसल्यानंतर उठताना त्रास होणे
:: चालण्यास त्रास होणे
- लक्षणे दिसताच उपचार आवश्यक ()
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी हाडाशी संबंधित कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. यासाठी मेडिकलमध्ये सोमवार व गुरुवारी विशेष ‘ओपीडी’ची सोय आहे. येथूनच ‘बोन डेथ’चे रुग्ण आढळून आले आहे. या आजाराचा पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास औषधोपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो. अन्यथा ‘हिप रिप्लेसमेंट’ची गरज पडते.
-डॉ. मो. फैजल, प्रमुख अस्थिव्यंगोपचार विभाग