नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: गेल्या काही दिवसांपासून सर्वच मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढल्याने रेल्वेगाड्या भरभरून धावत आहेत. ही स्थिती ध्यानात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वेगवेगळ्या मार्गाने धावणाऱ्या १० रेल्वे गाड्यांना तब्बल ३४ अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नवरात्र दसरा, दिवाळी, छटपूजेच्या निमित्ताने प्रवाशांच्या गर्दीत मोठी वाढ होते. ते लक्षात घेत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून १० रेल्वेगाड्यांमध्ये कायमस्वरूपी ३४ डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात गाडी क्रमांक २२१४१/२२१४२ पुणे - नागपूर - पुणे हमसफर एक्सप्रेस ( दोन्ही गाड्यात पाच-पाच अतिरिक्त डब्यांची सुविधा १२ आणि १३ ऑक्टोबरपासून), गाडी क्रमांक २२१३९ पुणे-अजनी हमसफर एक्सप्रेस, २२१४० अजनी - पुणे हमसफर एक्सप्रेस (दोन्ही गाड्यांमध्ये प्रत्येकी पाच अतिरिक्त डब्यांची सुविधा १४ आणि १५ ऑक्टोबरपासून), गाडी क्रमांक ०११३९/०११४० नागपूर - मडगाव - नागपूर (प्रत्येकी दोन अतिरिक्त डब्याची सुविधा १४ आणि १५ ऑक्टोबरपासून), गाडी क्रमांक ११०४५ / ११०४६ कोल्हापूर - धनबाद - कोल्हापूर (प्रत्येकी एक अतिरिक्त कोचची सुविधा १३ आणि १६ ऑक्टोबरपासून) आणि गाडी क्रमांक ०११२७ / ०११२८ एलटीटी - बल्लारशाह - एलटीटी स्पेशल (प्रत्येकी चार चार अतिरिक्त डब्यांची सुविधा १७ आणि १८ ऑक्टोबरपासून) या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.