निर्बंधांकडे कानाडोळा, नागपुरातील रस्त्यावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:07 AM2021-04-16T04:07:08+5:302021-04-16T04:07:08+5:30
नागपूर : राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली असून, आवश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे ...
नागपूर : राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली असून, आवश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर प्रतिनिधीने विविध बाजारपेठांची पाहणी केली असता, काही भागात मागच्या दाराने दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. शिवाय बाजारपेठांमध्ये लोकांची गर्दी आणि रस्त्यावर वाहने मोठ्या प्रमाणात धावताना दिसून आली. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी कर्फ्यूचा फज्जा उडाला होता.
महाल आणि इतवारी भागाची पाहणी केली असता दुकाने बंद होती, पण रस्त्यावर लोकांची आणि वाहनांची गर्दी होती. इतवारी मस्कासाथ घाऊक किराणा ओळ, गांजाखेत, गोळीबार चौक, देवघरे मोहल्ला, मोमिनपुरा, डागा चौक, गांधीबाग चौक, तीन नल चौक, टिमकी, पाचपावली येथील बाजारपेठांची पाहणी केली. गोळीबार चौकाकडून इतवारी स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मस्कासाथ भागातील घाऊक किराणा ओळीत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस वा मनपाचे पथक दिसले नाही. व्यापारीही ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यास सांगत नव्हते. या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून आली. या मार्गावर भाज्यांच्या ठेल्यांवर गर्दी होती, शिवाय फेरीवाले मोठ्या प्रमाणात दिसून आले. त्यांना थांबविणारे कुणीही नव्हते. अशी परिस्थिती असेल तर कोरोनावर कसे नियंत्रण येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
डागा चौकात वाहतूक पोलीस चालान फाडण्यात मग्न
गांधीबाग, डागा चौकात वाहतूक पोलीस वाहनचालकांना थांबवून चालान फाडण्यात मग्न होते. लोकांना विनाकारण फिरू नका, असा सल्ला पोलिसांनी कुणालाही दिला नाही. अनेकांनी मास्क घातले नव्हते.
तहसील ठाण्याचे पोलीस दिसलेच नाही
या सर्व बाजारपेठा तहसील ठाण्यांतर्गत येतात. पाहणी केली असता गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कुठेही पोलीस दिसले नाही. तहसील पोलीस ठाण्याचे निरीक्षक आजारी असल्याने घरी असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ ठाण्यात नसल्याने पोलीस ठाण्याबाहेर निघाले नाहीत.
गांधीबाग व गांजाखेत चौकातील दुकाने मागच्या दाराने खुली
गांधीबाग, गांजाखेत चौक आणि तीन नल चौकात कपड्यांची आणि अन्य दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. दुकानांना कुलूप असले तरीही अनेक दुकाने मागच्या दाराने सुरू असल्याचे दिसून आले. नागरिक म्हणाले, ही दुकाने रोजच सुरू असतात. त्यांच्यावर नियंत्रण आणणारे कुणीही नाही. मनपाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी तीन नल चौकातील आराधना साडी स्टोअर्सवर कारवाई केली होती. अशीच कारवाई येथील बाजारपेठांमध्ये करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
इतवारी मस्कासाथ बाजारात ग्राहकांच्या गर्दीवर नियंत्रण आणावे
इतवारी मस्कासाथ येथील घाऊक किराणा बाजारात दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. चिल्लर किराणा दुकानदार आणि ग्राहक खरेदीसाठी गर्दी करतात. या बाजारात मनपाचे अधिकारी वा पोलीस कारवाई करीत नाहीत, शिवाय वाहनांची गर्दी असते. लॉकडाऊनच्या काळात लोकांची या बाजारात गर्दी वाढल्याचे दिसून आले.