नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - आलोकने गळा घोटल्यामुळे आमिषाची जीभ बाहेर आली होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता तर, अंगात सैतान संचारलेला आलोक ती लवकर मरावी म्हणून वाट बघत होता. आतल्या खोलीत असलेली सासू या दोघांच्या खोलीत आली तेव्हा तो म्हणाला, बघा ना मरत पण नाही ....अन् नंतर त्याने चाकूने आमिषाचा गळाच कापून टाकला.
अंगावर शहारे आणणारे आणि सर्वत्र प्रचंड खळबळ उडविणारे पाचपावलीतील पाच जणांचे हत्याकांड घडवून आणणारा क्रूरकर्मा आलोक ऊर्फ चंदू अशोक मातुरकर (वय ४५) याने स्वत:लाही संपविले. त्यामुळे या थरारकांडाचे अनेक पैलू गुलदस्त्यात आहे. ते उलगडण्यासाठी अख्खी पोलीस यंत्रणा गेल्या ३६ तासांपासून काम करत आहे. या हत्याकांडाची कारणमीमांसा स्पष्ट करणारे काही महत्वाचे पुरावे पोलिसांना मिळाले आहे. त्यात आमिषाचा मोबाईल आणि या मोबाईलमधील ऑडिओ क्लीपचा समावेश आहे. या क्लीपमुळे क्रूरकर्मा आलोक कसा हिंसक झाला, त्याने अमिषा आणि नंतर तिची आई लक्ष्मीबाई बोबडे यांची कशी निर्दयपणे हत्या केली, ते लक्षात येते.
गोपनीय सूत्रांनुसार, २७ मिनिटांची ही ऑडिओ क्लीप आहे. त्यानुसार, अमिषाने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्यामुळे तो क्षुब्ध झाला होता. त्यात अमिषाचा बबलू, यश सोबतचा सलग संपर्क त्याला खपतच नव्हता. ‘तू फक्त माझीच बनून रहा’, असे तो अमिषाला बजावत होता. तर, ‘मी माझ्या मनाची मालकीण आहे, मनात येईल तसे वागेन, तू तुझे बघ’ असे ती त्याला ठणकावून सांगत होती. ती स्वैर झाल्यामुळे ही आता आपली राहिली नाही, असे आलोकच्या लक्षात आले होते. त्याचमुळे ‘तू मेरी नही तो किसी और की भी नही’ असे म्हणत तिला संपविण्याचा त्याने निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर, आलोक रविवारी रात्री अमिषाच्या घरी गेला. त्याची देहबोली बघून अमिषाला धोका लक्षात आला. त्यामुळे तिने आधी आपल्या मोबाईलचे रेकॉर्डर सुरू केले. नंतर त्याच्याशी शरीरसंबंधाची तयारी दाखवली. तो शांत होईल, असे तिला वाटले मात्र तसे काही झाले नाही. शरीरसंबंधानंतर त्याने तिच्याशी वाद घालून तिचा गळा घोटला. बराच वेळपर्यंत ती आचके देत होती. तेवढ्यात अमिषाची आई त्या खोलीत आली. सैतान बनलेल्या आलोकने मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या अमिषाला शिवी हासडली. सासूकडे बघून, मरत पण नाही लवकर... असे म्हणतानाच चाकूचे तिचा गळा कापला. ते बघून अमिषाची आई लक्ष्मीबाई शोकविव्हळ झाली. ती विलाप करत असल्यामुळे आलोकने सासूला इशारा दिला. ‘तू आरडाओरड केल्यास ठार मारेन’, असे म्हटले आणि नंतर कशाचीही वाट न बघता सासूचाही गळा कापला. त्यानंतर तो स्वत:च्या घराकडे निघाला. तेथे त्याने पत्नी विजया, मुलगी परी आणि मुलगा साहिल याची हत्या करून आत्महत्या केली. त्याच्या क्राैर्याचा पुरावा ठरलेली अमिषाच्या मोबाईलमधील क्लीप पोलिसांच्या हाती लागली. त्यातील संभाषणाचा आशय पुढीलप्रमाणे आहे.
---
असा आहे संभाषणाचा आशय।
अमिषा - तू आला का... ये ... आता लाजतोस कशाला ..
(दोघांचे हसणे खिदळणे.. एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव... शरीरसंबंधाची तयारी.. काही वेळेनंतर...)
आलोक - तू माझी पोलिसांकडे तक्रार का केली...?
अमिषा - म्हणजे काय, मी का तुझी (...) आहे का? मी माझ्या मनाची मालकीण आहे. तू आपले काम कर...
आलोक - तू चांगली वाग...
अमिषा- तू चांगला वाग,अन्यथा पुन्हा तुझी तक्रार करेन...
(अमिषाचे हे वाक्य त्याच्या जिव्हारी लागते अन् तो अचानक हिंसक होतो. दोघे एकमेकांना अश्लील शिव्या देतात. तो मारहाण करून अर्धनग्न अवस्थेतील अमिषाचा गळा घोटतो. ती आचके देत असते. तेवढ्यात त्या खोलीत अमिषाची आई लक्ष्मीबाई येते. त्यांना बघून ही मरत का नाही...असा सवाल आलोक करतो. नंतर अमिषाचा गळा कापतो.)
लक्ष्मीबाई - जावई ... तुम्ही हे का केले...
आलोक - तुम्ही ओरडू नका, लोक जागतील.. गप्प रहा... ऐकत नाही का...त्याचक्षणी लक्ष्मीबाईंची किंकाळी (त्याने त्यांचाही गळा कापला) नंतर सगळे शांत.
---