नागपूरकरांसाठी सांस्कृतिक पर्वणी : खासदार सांस्कृतिक महोत्सव ३० पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:43 PM2018-11-27T22:43:53+5:302018-11-27T22:45:12+5:30
नागपूरकरांच्या आकर्षणाचा विषय ठरलेला बहुप्रतीक्षित असा खासदार सांस्कृतिक महोत्सव ३० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. संगीत, नृत्य, महानाट्य अन् बॅलेची मेजवानी असलेला हा महोत्सव नागपूरकरांसाठी एक सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकरांच्या आकर्षणाचा विषय ठरलेला बहुप्रतीक्षित असा खासदारसांस्कृतिक महोत्सव ३० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. संगीत, नृत्य, महानाट्य अन् बॅलेची मेजवानी असलेला हा महोत्सव नागपूरकरांसाठी एक सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित या महोत्सवाचे सायंकाळी ६ वाजता अभिनेते अनिल कपूर व जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते उद्घाटन होईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकार होत आहे. यावेळी गडकरी यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर नंदा जिचकार उपस्थित राहतील. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘यादों का चला कारवां’ हा गाण्यांचा कार्यक्रम होईल. १८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होईल. विशेष म्हणजे मनोरंजनाचा खजिना असलेल्या या महोत्सवात नागपुरातील तब्बल ९०० कलावंतांना सामावून घेण्यात आले असल्याची माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष आ. अनिल सोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या टीम तयार करण्यात आल्या असून, कार्यक्रमस्थळी दररोज सकाळी १० वाजता नि:शुल्क पासेस वितरण केले जाईल. पत्रकार परिषदेला जयप्रकाश गुप्ता, मधुप पांडेय, राजेश बागडी, बाळ कुळकर्णी, हाजी अब्दुस कदीर, संदीप गवई, संजय गुळकरी, प्रमोद पेंडके उपस्थित होते.
असा आहे महोत्सव
- ३० नोव्हेंबर : उद्घाटन व ‘यादों का चला कारवां’गाण्यांचा कार्यक्रम.
- १ डिसेंबर : गायक संगीतकार श्रीधर फडके यांचा ‘बाबुजींची गाणी’ कार्यक्रम.
- २ डिसेंबर : ‘चला हवा येऊ द्या’ची टीम हसवून लोटपोट करणार.
- ७ डिसेंबर : तथागत महानाट्य
- ८ डिसेंबर : ‘राष्ट्रपुरुष अटल’ महानाट्य
- ९ डिसेंबर : गायक व खा. मनोज तिवारी यांचा ‘उत्तर भारत की सुगंध’ सांगीतिक कार्यक्रम.
- १० डिसेंबर : मनोज जोशी यांचे ‘चाणक्य’ नाटक.
- ११ डिसेंबर : रामकृष्ण मठ प्रस्तुत ‘युगपुरुष विवेकानंद’ संगीतमय चरित्रपट.
- १२ डिसेंबर : अभिनेते मोहन जोशी व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या ‘नटसम्राट’ नाटकाचा प्रयोग.
- १४ डिसेंबर : राकेश चौरसिया यांचा फ्युजन व शिवमणी यांचे ड्रम वादन.
- १५ डिसेंबर : ‘बॅले आॅन गंगा’ अनोखा कार्यक्रम.
- १६ डिसेंबर : अभिनेत्री हेमा मालिनी यांची ‘दुर्गा’ नृत्यनाटिका.
- १७ डिसेंबर : ‘शिर्डी के साईबाबा’ महानाट्य.
- १८ डिसेंबर : ‘नाद अनाहद’ हा नादब्रह्मचा सृजनात्मक सांगीतिक आविष्कार.
नागपूरकराने संगीतबद्ध केले महोत्सवाचे ‘थीम साँग’
महोत्सवासाठी विशेष ‘थीम सॉँग’ तयार करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर याने ते गायले आहे. विशेष म्हणजे नागपूरकर संगीतकार मोरेश्वर निस्ताने यांनी ते संगीतबद्ध केले आहे.