सहायक अनुदानापासून सांस्कृतिक संस्था वर्षभरापासून वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:22 AM2020-09-30T10:22:43+5:302020-09-30T10:23:04+5:30
प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फत सहायक अनुदान योजना अनेक वर्षापासून राबविण्यात येत आहे. मात्र, गेल्या वर्षभरात हे अनुदान राज्यातील एकाही संस्थेला प्राप्त झालेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फत सहायक अनुदान योजना अनेक वर्षापासून राबविण्यात येत आहे. मात्र, गेल्या वर्षभरात हे अनुदान राज्यातील एकाही संस्थेला प्राप्त झालेले नाही.
सांस्कृतिक संचालनालयामार्फत हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिकांसोबतच सांस्कृतिक संस्थांना सहायक अनुदान योजनेच्या अर्जांची घोषणा केली जाते. दरवर्षी ऑगस्टमध्ये या योजना जाहीर केल्या जातात. साधारणत: फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत स्पर्धा आटोपतात आणि त्यानंतर हे अनुदान संबंधित संस्थांना दिले जाते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सर्वच कामे खोळंबली आहेत.
शासनाच्या सर्वच संस्था कोरोनाविरूद्ध लढ्यात येनकेन प्रकारे सहभागी झाल्या. त्यामुळे २०१९मध्ये अनुदानासाठी मागविलेले अर्ज अद्याप निकाली काढण्यात आलेले नाहीत. सांस्कृतिक क्षेत्रात लोकप्रबोधन, मनोरंजन आणि लुप्त कलांना पुढे आणणाऱ्या संस्थांना अर्थसाहाय्य म्हणून संचालनालयामार्फत सहाय्यक अनुदान योजना राबविण्यात येते. अ गटासाठी दोन लाख, ब गटासाठी एक लाख आणि क गटासाठी ५० हजार रुपये असे अनुदान संस्थेच्या कार्याच्या दर्जानुसार दिले जाते. एकदा हे अनुदान प्राप्त झाले की पुढची तीन वर्षे हे अनुदान घेण्यास या संस्थेला परवानगी नसते. मात्र, २०१९मध्ये जारी झालेले हे अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. यंदा अनुदानासाठीचे अर्ज संचालनालयाकडून अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, राज्यातील अनेक संस्था अनुदान मिळण्याची वाट बघत आहेत.
राज्य नाट्य स्पर्धांचे परतावेही नाहीत!
अनुदान वगळता हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीतनाट्य आणि बालनाट्य स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या संस्थांना नियमानुसार मिळावयाचे भत्ते व परतावे अद्याप प्राप्त झालेले नाहीत. साधारणत: मार्च महिन्यातच ही पूर्तता होत असते. सांस्कृतिक संचालनालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हे भत्ते व परतावे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात संस्थांना मिळणार आहेत.
यंदा स्पर्धेवर टाच!
हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे हे ६० वे वर्ष असून, स्पर्धेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. संचालनालयाने या वर्षी नाटकांचा विशेष महोत्सव आयोजित करण्याचा निर्धार केला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता यंदा स्पर्धेवर टाच आल्याचे स्पष्ट होत आहे.