दाभोळकर, पानसरेंचे हत्यारे दडलेत कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:11 AM2021-08-21T04:11:18+5:302021-08-21T04:11:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर व डावे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर व डावे विचारक गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईचा निषेध व्यक्त करत शुक्रवारी व्हेरायटी चौक ते संविधान चौकापर्यंत निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या २० ऑगस्ट २०१३ रोजी झाली होती. या घटनेला शुक्रवारी आठ वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर डावे विचारक गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे हत्या करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही विचारकांच्या हत्येच्या तपासात प्रचंड दिरंगाई असून, आजवर मारेकऱ्यांच्या मुख्य सूत्रधारास अटक झालेली नाही. यासोबतच एम. एम. कलबुर्गी यांची धारवाड येथे ३० ऑगस्ट २०१५ रोजी हत्या करण्यात आली. नंतर सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांचीही अशाच तऱ्हेने हत्या झाली. मात्र, आरोपींचा कोणताही ठावठिकाणा लागत नाही, हे तपास यंत्रणेचे अपयश आहे. या निषेधार्थ शुक्रवारी महाराष्ट्र अंनिसकडून निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले. त्यानंतर खुनात सहभागी असलेल्या संघटना व सूत्रधारांना अटक व्हावी व त्यांची संपत्ती जप्त व्हावी, चारही प्रकरणात सरकारने निष्णात वकिलांची नियुक्ती करावी, संबंधित संघटनांवर बंदी आणावी, सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांचे रक्षण करावे, अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी समितीचे राज्य सरचिटणीस संजय शेंडे, जिल्हा अध्यक्ष जगजित सिंह, जिल्हा प्रधान सचिव गौरव आळणे, शाखा कार्याध्यक्ष अशोक खोरगडे, जिल्हा बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाहक मंजूश्री फोपरे, संजय भालमे, चैताली रामटेके उपस्थित होते.
................