नागपूर शहर बससेवा बंद होण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:12 PM2018-08-17T22:12:49+5:302018-08-17T22:13:28+5:30
मनपाची आर्थिक परिस्थिती अगोदरच बिघडलेली आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत असलेल्या ‘आपली बस’ने मनपा प्रशासनाला अडचणीत टाकले आहे. जीएसटीसह बिल देयकाच्या मुद्यावर ग्रीन बस आॅपरेटर स्कॅनियाने पाच दिवसांपूर्वीच आपली सेवा बंद केली आहे. रेड (लाल) बसच्या तीन आॅपरेटरलाही मनपा नियमित देयके अदा करण्यास असमर्थ ठरत आहे. आॅपरेटरचे एकूण ४२ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी केवळ ७.५० कोटी रुपयांचे देयकेच अदा करता आले आहे. अशा परिस्थितीत रेड बसची चाके कधी बंद पडतील हे सांगता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाची आर्थिक परिस्थिती अगोदरच बिघडलेली आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत असलेल्या ‘आपली बस’ने मनपा प्रशासनाला अडचणीत टाकले आहे. जीएसटीसह बिल देयकाच्या मुद्यावर ग्रीन बस आॅपरेटर स्कॅनियाने पाच दिवसांपूर्वीच आपली सेवा बंद केली आहे. रेड (लाल) बसच्या तीन आॅपरेटरलाही मनपा नियमित देयके अदा करण्यास असमर्थ ठरत आहे. आॅपरेटरचे एकूण ४२ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी केवळ ७.५० कोटी रुपयांचे देयकेच अदा करता आले आहे. अशा परिस्थितीत रेड बसची चाके कधी बंद पडतील हे सांगता येत नाही.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या आठवड्यातच मनपा मुख्यालयात रविवारी बैठक घेऊन वाहतूक सेवेसह शहराशी संबंधित दोन डझन मुद्यांवर चर्चा केली. या बैठकीत ग्रीन बससेवा सुरू ठेवण्याबाबत स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीच्या प्रतिनिधींशी बोलणेही केले होते, परंतु ते तयार झाले नाहीत. ग्रीन बससेवा १३ आॅगस्टपासून शहरात बंद झाली आहे. संबंधित बैठकीत २३ आॅगस्टला नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्याची घोषणाही गडकरींनी केली होती. ती बैठक आता २२ आॅगस्ट रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात तीन रेड बस आॅपरेटर आहेत. आॅपरेटरचे जुलै शेवटपर्यंतचे प्रत्येकी १४ कोटी रुपये थकीत आहेत. पैसे न मिळाल्यामुळे तिन्ही आॅपरेटरनी बससेवा एक दिवस बंदही ठेवली होती. त्यानंतर मनपा प्रशासनाने तातडीने आॅपरेटरला प्रत्येकी २.५० कोटी रुपये अदा केले होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीत तिकिटांपासून होणार उत्पन्न आॅपरेटरलाच देण्याचे निर्देश दिले होते. परंतु मनपा प्रशासन ऐकायला तयार नाही. वित्त विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे वाटत आहे की, केंद्रीय मंत्र्यांचे आदेश त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचे नाहीत.
बससेवेसह नागनदी प्रकल्पावरही होणार चर्चा
नवी दिल्ली येथे २२ आॅगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बससेवा, नागनदी पुनरुत्थान प्रकल्प आणि शहरात सुरू असलेल्या एनएचआयच्या कामांचा आढावा घेतील. या बैठकीत ग्रीन बसवर प्रामुख्याने चर्चा होईल. यात जीएसटीसह ग्रीन बसची थकीत रक्कम अदा करणे, अॅस्क्रो अकाऊंट, सर्व सुविधायुक्त डेपो यावरही चर्चा होईल.