अपार्टमेंटमधून दिवसाढवळ्या चोरली बुलेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 09:18 PM2019-08-02T21:18:44+5:302019-08-02T21:20:46+5:30
चोरांची हिंमत आता इतकी वाढली आहे की, ते दिवसाढवळ्याही चोरी करू लागले आहेत. वाहन चोरांनी गुरुवारी खरे टाऊन धरमपेठ येथील एका अपार्टमेंटमधून दिवसाढवळ्या बुलेट (बाईक) चोरून नेली. घटनेला ३० तास उलटल्यानंतरही सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, तक्रारकर्ते शहराबाहेर असल्याने गुन्हा दाखल केलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चोरांची हिंमत आता इतकी वाढली आहे की, ते दिवसाढवळ्याही चोरी करू लागले आहेत. वाहन चोरांनी गुरुवारी खरे टाऊन धरमपेठ येथील एका अपार्टमेंटमधून दिवसाढवळ्या बुलेट (बाईक) चोरून नेली. घटनेला ३० तास उलटल्यानंतरही सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, तक्रारकर्ते शहराबाहेर असल्याने गुन्हा दाखल केलेला नाही.
खरे टाऊन येथील अनिरुद्ध अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावर ट्रॅव्हल्स एजन्सीचे संचालक अनिकेत डवले राहतात. डवले यांनी त्यांची एम.एच.३१/ईडब्ल्यू/०२०२ क्रमांकाची बुलेट अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क करून ठेवली होती. गुरुवारी दुपारी २ वाजता एका बाईकवर तीन युवक अपार्टमेंटजवळ आले आणि परिसराची पाहणी करून परत गेले. १५ मिनिटानंतर पार्किंगमध्ये ठेवलेली अनिकेत यांची बुलेट चोरण्याचा प्रयत्न करू लागले. दरम्यान बेसमेंटमध्ये राहणाºया एका महिलेची नजर आरोपींवर गेली. महिलेला जवळ येताना पाहून आरोपी मोबाईलवर बोलण्याचे नाटक करू लागले. ते अशाप्रकारे बोलत होते की, कुणाच्या तरी सांगण्यावरून ते बुलेट घ्यायला आले आहेत. त्यामुळे महिलाही आपले काम करू लागली. एक आरोपी केवळ पाच मिनिटात दीड लाख रुपये किमतीची बुलेट चोरून अपार्टमेंटच्या बाहेर आला. तो बुलेटवर स्वार झाला. त्यांच्यापैकी तिसरा साथीदार अगोदरच बाहेर उभा होता. तो बुलेटला धक्का देऊ लागला. दोघेही बुलेट घेऊन फरार झाले.
रात्री ८ वाजताच्या सुमारास अनिकेत आणि त्यांची पत्नी खरेदी करण्यासाठी खाली उतरले. त्यांना बुलेट जागेवर दिसली नाही. त्यांनी विचारपूस केली असता महिलेने घडलेला प्रकार सांगितला. अनिकेत यांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण प्रकार लक्षात आला. यानंतर सीताबर्डी पोलिसांना सूचना देण्यात आली.
ज्या ठिकाणी ही घटना घडली तो रहिवासी परिसर आहे. तिथे नेहमीच नागरिकांची ये-जा असते. जवळच दोन गर्ल्स होस्टेल आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीशांचे निवासस्थानही आहे. खरे टाऊन परिसरात नेहमीच व्हीआयपी मंडळींची ये-जा असते. पोलिसांचीही नेहमी गस्त असते. यानंतरही आरोपींनी मोठ्या हिमतीने दिवसाढवळ्या बुलेट चोरून नेली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपीचा शोध घेतला जात आहे.
सराईत गुन्हेगार असल्याचा संशय
आरोपींनी ज्या पद्धतीने दिवसाढवळ्या वाहन चोरून नेले. त्यावरून ते सराईत वाहन चोर असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षदर्शी महिलेने त्यांना पार्किंगमध्ये पाहिले. तेव्हा तिने याबाबत अनिकेतला सांगण्याचे ठरवले. आरोपींच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी लगेच मोबाईलवर अशा पद्धतीने बोलण्याचे नाटक केले की, अनिकेत यांनीच जाणून त्यांना बुलेट घेऊन जाण्यास संगितले असावे.