शालांत परीक्षा ‘आॅनलाईन’ अर्ज : ८ जानेवारीपर्यंत मुदतवाढनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत यंदा दहावीच्या परीक्षेसाठी ‘आॅनलाईन’ पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. परंतु तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना व शाळांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मंडळाच्या वतीने यंदा दहावीच्या परीक्षेसाठी आॅनलाईन पद्घतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र, मंडळाच्या संकेतस्थळात अनेक उणिवा असल्यामुळे अर्ज प्रक्रियेत अनेक अडचणी येत आहेत. विशेषत: ग्रामीण भागात अनेक शाळांना अर्ज ‘अपलोड’ करणे त्रासदायक ठरत आहे. ३ जानेवारी ते ८ जानेवारी ही विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत होती. परंतु तांत्रिक अडचणींचे कारण असल्यामुळे नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर भरण्यात येणारे अर्ज हे अतिविलंब शुल्कासह भरावे लागतील, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी पहिल्यांदाच आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. दहावीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू झाली होती. मात्र शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ धीम्या गतीने चालत असल्याने हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज व त्यासाठी माहिती अपलोड होण्यास अडचण येत होती. त्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांची तारांबळ उडाली होती.अनेक ठिकाणी इंटरनेटच्या अडचणींमुळे अर्ज पूर्ण भरण्यास अडचणी होत्या. यामुळे मुदतवाढ दिली नाही तर अनेकांचे अर्ज भरले जाणार नसल्याची भीती व्यक्त होत होती. मंडळाने ही मुदतवाढ दिल्याने अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
तांत्रिक अडचणींमुळे तारीख पे तारीख
By admin | Published: January 05, 2015 12:46 AM