पित्याच्या अवयवदानासाठी मुलीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:10 AM2021-08-26T04:10:09+5:302021-08-26T04:10:09+5:30

नागपूर : अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे ...

Daughter's initiative for father's organ donation | पित्याच्या अवयवदानासाठी मुलीचा पुढाकार

पित्याच्या अवयवदानासाठी मुलीचा पुढाकार

Next

नागपूर : अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे वर्षानवर्षे अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना जीवनदान मिळत आहे. बुधवारी मेंदू मृत (ब्रेन डेड) झालेल्या पित्याच्या अवयवदानासाठी त्यांच्या पत्नी आणि मुलीने पुढाकार घेतला. यामुळे तिघांना जीवनदान मिळाले.

भीमराज रामदास गजभिये (६२, रा. सिस्टर कॉलनी नागीनबाग, चंद्रपूर) असे अवयव दात्याचे नाव. उपलब्ध माहितीनुसार, ‘डब्ल्यूसीएल’मधून निवृत्त झालेले गजभिये २० ऑगस्ट रोजी घरातील बाथरुममध्ये पाय घसरून पडले. त्यांच्या पत्नीने लागलीच जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करीत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. पुढील उपचारासाठी नागपुरातील किंग्जवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. २४ ऑगस्ट रोजी उपचार सुरू असताना डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांचे ‘ब्रेन डेड’ झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. अचानक झालेल्या या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला. डॉक्टरांनी परिस्थितीची जाणीव करून देत अवयवदानाचा सल्ला दिला. त्यांच्या पत्नी कुसूम, मुलगी स्नेहल गजभिये यांनी त्या दु:खातही आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचीव डॉ. संज़य कोलते यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन कोऑर्डिनेटर वीना वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. दोन्ही मूत्रपिंड व यकृताचे दान करण्यात आले. आतापर्यंतचे हे ७६वे अयवदान तर या महिन्यातील हे तिसरे अवयवदान ठरले.

-न्यू इरा हॉस्पिटलमध्ये ४३वे यकृत प्रत्यारोपण

न्यू इरा हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय एका पुरुषाला यकृत दान करण्यात आले. हे ४३वे यकृत प्रत्यारोपण ठरले. प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, डॉ. निलेश अग्रवाल व डॉ. निधीश मिश्रा यांच्या मार्गदर्शनात यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. स्नेहा खाडे, डॉ. साहिल बन्सल, डॉ. अश्विनी चौधरी, पल्लवी जवादे, सुधाकर बुराङे, शैलेश खोब्रागडे, पूनम धराळे, गीता बावनकर व अर्चना नवघरे यांनी केली.

-मूत्रपिंडदानामुळे एका महिला व पुरुषाला मिळाले जीवनदान

गजभिये यांचे एक मूत्रपिंड किंग्जवे हॉस्पिटलमधील ५९ वर्षीय एका पुरुषाला देण्यात आले. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नेफ्रोलॉजी तज्ज्ञ डॉ. प्रकाश खेतान, डॉ. विशाल रामटेके, डॉ. वासुदेव रिधोरकर, डॉ. धनंजय बोकारे, डॉ. प्रज्वल महात्मे, डॉ. शीतल अवाड, डॉ. चंद्रशेखर चाम यांनी केली. तर दुसरे मूत्रपिंड ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या ४८ वर्षीय महिलेला देण्यात आले. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नेफ्रोलॉजिस्ट डॉ. एस.जे. आचार्य, डॉ. सुहास साल्पेकर, डॉ. अमित देशपांडे, डॉ. स्मिता हरकरे, डॉ. अनिता पांडे यांनी केली.

Web Title: Daughter's initiative for father's organ donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.