विदर्भाच्या कटाहदिनाे राजाने साकारला अजिंठा लेणीचा दर्शनी भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:08 AM2021-01-14T04:08:33+5:302021-01-14T04:08:33+5:30
नागपूर : नागपूरच्या पुरातत्व संशाेधकांनी नुकतीच अजिंठा लेण्यांबाबत महत्त्वपूर्ण नाेंद केली आहे. अजिंठामधील १० व्या क्रमांकाच्या लेणीचा दर्शनी भाग ...
नागपूर : नागपूरच्या पुरातत्व संशाेधकांनी नुकतीच अजिंठा लेण्यांबाबत महत्त्वपूर्ण नाेंद केली आहे. अजिंठामधील १० व्या क्रमांकाच्या लेणीचा दर्शनी भाग विदर्भातील राजाने साकारल्याचे स्पष्ट झाले आहे. या राजाचे नाव कटाहदिनाे असे असून, ते अकाेल्याजवळच्या आकाेट येथे वास्तव्यास असल्याची नाेंद सापडली आहे. २००० वर्षांपूर्वी हे प्रवेशद्वार तयार केल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूरचे पुरातत्व आणि इतिहास संशाेधक डाॅ. चंद्रशेखर गुप्त यांनी ही अतिशय महत्त्वपूर्ण नाेंद केली आहे. इंग्लिश पुरतत्व संशाेधक जाॅन स्मिथ याने अजिंठा लेण्यांना शाेधून काढल्यापासून पुरातत्व विभाग आणि अनेक पुरातत्व अभ्यासक लेण्यांमधील नाेंदीबाबत अभ्यास करीत आहेत. या लेण्या सातवाहन राजवटीपासून ते मूळचे विदर्भातील वाकाटक राजवटीतील राजांकडून बाैद्ध श्रामणेर चातुर्मासादरम्यान राहण्यासाठी काेरल्या गेल्याचे पुरावे यातूनच बाहेर आले. मात्र, असंख्य बाबींवर संशाेधन हाेणे बाकी आहे.
डाॅ. गुप्त यांनी सांगितले, १० व्या क्रमांकाच्या गुहेच्या प्रवेशद्वारावर एक शिलालेख काेरलेला आहे. वसिस्ठीपुतस्य कटाहदिनाे घरमुख दानम असे त्यावर काेरले आहे. हे शिलालेख गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यासकांसाठी आव्हान ठरले हाेते. इ.सन पूर्व २०० ते ३०० या ४०० ते ४५० वर्षांच्या काळात असलेल्या सातवाहन किंवा वाकाटक राजवटीत ते केले असल्याचे आतापर्यंत गृहीत धरले जात हाेते. मात्र, काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या एका नाणे संग्राहकाकडून एक पुरातन नाणे डाॅ. गुप्त यांना मिळाले आणि आतापर्यंत शिलालेखाबाबत असलेल्या संभ्रमावरून पडदा उघडला. त्या नाण्यावरही वसिस्ठीपुतस्य कटाहदिनाे असा उल्लेख हाेता व ते २००० वर्षांपूर्वी आकाेटमध्ये असलेल्या कटाहदिनाे राजवटीचे असल्याचे लक्षात आले. वसिस्ठी हे त्याच्या आईचे नाव आणि त्यावेळी आईच्या नावानेही राजे आपली नाेंद करायचे, हेही लक्षात येते. यावरून कटाहदिनाे यांनीच दान करून लेणी क्रमांक १० चे प्रवेशद्वार बनविल्याचा खुलासा हाेताे.
विदर्भाच्या व एकुणच पुरातत्व संशाेधनाच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण संशाेधन आहे. यामुळे अजिंठामधील इतिहास संशाेधनाला चालना मिळेल.
- डाॅ. शेषशयन देशमुख, व्यवस्थापक, विदर्भ संशाेधन मंडळ
मंडळाचा ८८ वा स्थापना दिवस आज
विदर्भ संशाेधन मंडळाचा आज ८८ वा स्थापना दिवस आहे. १९३४ साली मकर संक्रांतीच्याच दिवशी इतिहास संशाेधक डाॅ. वा. वी. मिराशी यांच्या पुढाकाराने या मंडळाची मुहूर्तमेढ राेवली गेली. तेव्हापासून पुरातत्वासाेबत साहित्य व इतिहास संशाेधनात महत्त्वाचे कार्य या माध्यमातून झाले आहे. स्थापना दिनानिमित्त गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मंडळाच्या डाॅ. मिराशी सभागृहात डाॅ. चंद्रशेखर गुप्त यांच्या व्याख्यानाचे आयाेजन करण्यात आले आहे. ते आकाेटच्या रायाने घडविला अजिंठा लेणी क्र. १० चा दर्शनीभाग याच विषयावर सविस्तर प्रकाश टाकणार असल्याची माहिती डाॅ. देशमुख यांनी दिली.