लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस सेवेत गुड गव्हर्नन्ससाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल झोन पाचचे पेलीस उपायुक्त (डीसीपी) हर्ष पोद्दार यांना प्रतिष्ठित ‘जी फाईल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील सिव्हिल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटमध्ये केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फांस कन्नथनम यांनी विदेश राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग यांच्या उपस्थितीत पोद्दार यांना हा पुरस्कार प्रदान केला. नागरिकांना पोलिसांशी जोडणे आणि गुन्हे नियंत्रित आणण्यात बजावलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.पोद्दार हे जुलै २०१८ मध्ये मालेगाव येथे अपर पोलीस अधीक्षक होते. तेव्हा राज्यात मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरली होती. लोकांची भीड संशयातून हल्ले करीत होते. अशाच एका प्रकरणात मुले चोरणारी टोळी आल्याच्या संशयात धुळे जिल्ह्यातील रायनपाडा येथे पाच लोकांची गर्दीने हत्या केली. त्याच दिवशी मालेगावच्या आझादनगरात एका हिंसक गर्दीने पाच लोकांना घेरले. त्यांच्याजवळ दोन वर्षाचा चिमुकला होता. लोकांना असा संशय होता की, त्यांनी मुलाला चोरले आहे. हर्ष यांना या घटनेची माहिती होताच. उग्र लोकांच्या गर्दीत सापडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पोद्दार यांनी परिसराची घेराबंदी केली. लोक त्या पाच जणांना आपल्या स्वाधीन करण्याची मागणी करीत होते. गर्दीने पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला केला. तीन तास चाललेल्या या आॅपरेशननंतर पोद्दार यांनी बल प्रयोग करीत पाच लोकांचा जीव वाचवला होता.मालेगावमध्येच पोद्दार यांनी युवकांना जोडण्यासाठी ‘यूथ पार्लमेंट’चे आयोजन केले होते. याच्या माध्यमातून युवकांमध्ये दहशतवादाविरुद्ध जागरुकता निर्माण करण्यात आली होती. यानंतर मालेगाव, नाशिक आणि औरंगाबाद व कोल्हापूरच्या १८ जिल्ह्यांमध्ये यूथ पार्लमेंटचे आयोजन केले होते. दोन लाखपेक्षा अधिक युवकांना याच्याशी जोडण्यात आले. पोद्दार यांनी औरंगाबाद येथील वैजापूर विभागात कार्यरत असताना ‘स्मार्ट ठाणे’ या संकल्पनेची सुरुवात केली. वैजापूरला मराठवाड्यातील पहिले स्मार्ट पोलीस ठाणे बनविले. या संकल्पनेला पोद्दार यांनी कोल्हापूर आणि मालेगावमध्येही साकार केले.सर्वात युवा अधिकारी‘जी फाईल’ पुरस्कार हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. या पुरस्काराने आतापर्यंत १२ अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यात पोद्दार हे सर्वात युवा आणि महाराष्ट्रातून हा पुरस्कार मिळविणारे एकमेव अधिकारी आहेत. पोद्दार हे भारतीय पोलीस सेवेच्या २०१३ च्या बॅचचे अधिकारी आहे. ‘जी फाईल’ पुरस्काराचे सिव्हिल सर्व्हिस अधिकाऱ्यांमध्ये विशेष स्थान आहे. याच्या निवड समितीमध्ये सेवानिवृत्त कॅबिनेट सचिव आणि झारखंडचे माजी राज्यपाल प्रभात कुमार यांचा समावेश आहे.