जगात दुसऱ्यांदा फाशीनंतर शवपरीक्षण
By admin | Published: July 31, 2015 02:39 AM2015-07-31T02:39:36+5:302015-07-31T02:39:36+5:30
शेकडो निष्प्पापांचे बळी घेणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याला गुरुवारी सकाळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.
पहिल्यांदाच मेडिकलच्या बाहेर शवपरीक्षण : न्यायवैद्यकशास्त्र विभागाने पार पाडल्या संपूर्ण जबाबदाऱ्या
सुमेध वाघमारे नागपूर
शेकडो निष्प्पापांचे बळी घेणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याला गुरुवारी सकाळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. फाशीनंतर कारागृहातच त्याचे शवपरीक्षण करण्यात आले. जगात दुसऱ्यांदा आणि भारतात पहिल्यांदाच फाशीनंतर शवपरीक्षण करण्याची घटना घडली. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) न्यायवैद्यकशास्त्र विभागाने ही जबाबदारी पार पाडली.
इंग्लंडमध्ये १८५५ मध्ये जॉर्ज केली याला फाशी देण्यात आली. फाशीनंतर जॉर्जचा मृतदेह दफन करण्यात आला होता. परंतु त्याच्या मृत्यूनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यावेळी न्यायवैद्यकशास्त्र हा स्वतंत्र विभाग नव्हता. म्हणून पॅथालॉजी विभागाच्या एका डॉक्टरने जॉर्जचे शवविच्छेदन केले. फाशीनंतर केलेले हे जगातील पहिले शवविच्छेदन होते. सूत्रानुसार याकूब मेमन याच्या फाशीनंतर शवपरीक्षणाची जबाबदारी मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाकडे आली तेव्हा विभागापुढे अनेक प्रश्न होते. भारतात यापूर्वी फाशी दिल्यानंतर शवपरीक्षण झालेले नव्हते. यातच सुप्रीम कोर्टाने शवपरीक्षणाची मार्गदर्शक तत्त्वे दिल्याने आणि पहिल्यांदाच मेडिकलच्या बाहेर शवपरीक्षण होणार असल्याने न्यायवैद्यकशास्त्र विभागाला अत्यंत कमी वेळात अनेक गोष्टींची तयारी करावी लागली.
बुधवार रात्रीपासून तयारी
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मेमनचे शवपरीक्षण मध्यवर्ती कारागृहातच करण्याचा निर्णय झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दोन बैठकी पार पाडल्या. यात आवश्यक साहित्यासोबतच जागा ठरविण्यात आली. बुधवारी रात्री मेडिकलच्या आकस्मिक विभागातून शवविच्छेदनाचे दोन टेबल अॅम्ब्युलन्समधून तर एक पोर्टेबल एक्स-रे मशीन व इतर साहित्य पोलिसांच्या वाहनातून कारागृहात आणण्यात आले, तर फाशीच्या दिवशी पहाटे ४ वाजता न्यूरोलॉजीची उपकरणे पोहचविण्यात आली.
न्यायवैद्यकशास्त्र विभागासह इतर सहा विभागांचा सहभाग
मेमन याच्या शवपरीक्षणात मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह न्यूरोलॉजी, आॅर्थाेपेडिक्स, अॅनाटॉमी, रेडिओलॉजी व पॅथालॉजी विभागाचे प्रत्येकी एक डॉक्टर तर न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक) विभागाचे दोन डॉक्टर व एक तंत्रज्ञ असा नऊ जणांचा ताफा होता. प्रत्येक विभागाच्या तज्ज्ञानी आपले कार्य चोख केले.
७.५५ वाजता मिळाला मेमनचा मृतदेह
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे ७.५५ वाजता याकूब मेमनचा मृतदेह न्यायवैद्यकशास्त्र विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. फाशी यार्डपासून काही अंतरावर कापडी तंबूत शवपरीक्षणाची तयारी करण्यात आली होती. साधारण दीड तास हे शवपरीक्षण करण्यात आले.
सव्वा तासात शवपरीक्षण!
सुत्राच्या माहितीनुसार मेमेन याचा मृतदेह शवपरीक्षणासाठी सुमारे ७ वाजून ५५ मिनिटांनी मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभाग आणि त्यांच्या चमूच्या ताब्यात दिला. चमूला केवळ एक-दीड तासाचा वेळ दिला होता. यात शवपरिक्षणासह मृतदेह कुजू नये म्हणून रासायनिक प्रक्रिया करायचे होते. चमूने आपले अनुभव आणि कौशल्याच्या बळावर वेळेत शवपरिक्षण केले.