लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नायलॉन मांजाच्या वापराने सर्वसामान्यांच्या जीविताला प्रत्यक्ष धोका निर्माण झाला असतानाही शासन-प्रशासनाकडून दंडवसुलीची मिळमिळीत कारवाई केली जात आहे. मात्र, विक्रेते आणि ग्राहकांनी कायद्यालाच धाब्यावर बसवले असल्याने, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आळस दूर सारत मैदानात उतरणे अपेक्षित आहे.
चांगली असो वा वाईट, कोणत्याही अतिरेकाला पायबंद घालणे गरजेचे असते. पतंग उडविणे हा पारंपरिक खेळ आहे. त्यासाठी शौकिनांकडून वेगवेगळ्या शकली लढविल्या जातात. त्याच शृंखलेत पेच लढवताना आपला मांजा मजबूत असावा म्हणून नायलॉन मांजाचा प्रवेश झाला. मात्र, हा मांजा पेच रंगण्यापेक्षा जीव घेणाराच जास्त ठरतो आहे. या मांजामुळे अनेकांचा जीव गेला आहे. त्याविरोधात अनेक आंदोलने झाली आणि न्यायालयानेही याकडे लक्ष वेधले आहे. मात्र, शासन-प्रशासनाकडून केवळ दंडवसुलीचीच कारवाई केली जात असल्याने विक्रेते आणि ग्राहक नायलॉन मांजाचा वापर न करण्याबाबत फारसे गंभीर दिसत नाहीत. त्याचे दाखले अनेकांचा जीव गेल्यावरून सापडतात. काहीच दिवसापूर्वी गोधनी येथील एका विद्यार्थ्याचा गळा नायलॉन मांजामुळे कापला गेला होता. नागरिकांच्या दक्षतेमुळे आणि डॉक्टरांच्या तत्परतेमुळे किचकट ऑपरेशननंतर त्या विद्यार्थ्याचे प्राण वाचले होते. काही वर्षापूर्वी स्वत:च्या साक्षगंधासाठी नागपुरात आलेल्या आलेल्या एका युवकाचा गळाही नायलॉन मांजाने कापला गेला. ऑपरेशन व अन्य वैद्यकीय प्रयत्नानंतरही त्याचे प्राण वाचू शकले नव्हते. अशी अनेक प्रकरणे आहेत. आताही दररोज कुणाचे न कुणाचे गळे नायलॉन मांजामुळे कापले जात आहेत. बऱ्याच प्रकरणांत किरकोळ इजा असल्याने पीडित पोलीसांकडे तक्रार दाखल करत नाहीत आणि घटना मोठी नसल्याने ही प्रकरणे प्रकाशझोतात येत नाहीत. याचा अर्थ घटना मोठी असेल तरच प्रशासनाने गंभीर व्हावे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याने छुप्या माध्यमातून नायलॉन मांजाचा वापर प्रचंड वाढला आहे.
केवळ साहित्य जप्त
मनपा प्रशासनाकडून नायलॉन मांजा व प्लास्टिक पतंगांची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे आणि फोटो प्रसारित केले जात आहे. या कारवाईत विक्रेत्यांकडील साहित्य जप्त केले जातात व त्यांच्यावर किरकोळ दंड ठोठावल्या जाऊन तो वसूल केला जातो. त्यानंतर मात्र, विक्रेते मोकाट असतात. मुळात विक्रेत्यांकडे असलेले साहित्य जप्त करणे हा केवळ दिखावा आहे. मुख्य साठा गुप्त ठिकाणी असतो. सर्वसामान्यांचे जीव टांगणीला लावणाऱ्या या विक्रेत्यांवर कठोर कारवाई होईल तरच नायलॉन हद्दपार होणार आहे.
सतत धाकधूक
सणोत्सवाचा काळ आहे आणि संक्रांतीला अनेक जण दुचाकीवर लहान मुलांसह नातेवाईकांकडे जात असतात. याच काळात मांजाचे जाळे रस्तोरस्ती टांगलेले असतात. बरेचदा नायलॉन मांजा वाहकांना बाधतो. अशा स्थितीत नाजूक शरीराच्या असलेल्या मुलांना हा मांजा अडकला तर काय घडणार, हे न बोललेलेच बरे.
गुरुवारी संध्याकाळी गोधनीकडे असलेल्या माझ्या पेटिंग स्टुडिओतून परतत असताना मानकापूर उड्डाणपुलावर नायलॉन मांजा आडवा झाला. अचानक आलेला मांजा हटवत असतानाच स्कूटरचा तोल बिघडला आणि गाडीसह मी पडलो. रस्त्यातील नागरिकांनी मला उचलले. किरकोळ दुखापत झाल्याने बचावलो. मात्र, मांजा तुटता तुटेना. प्रशासनाने हा मांजा वापरणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.
- प्रकाश बेतावार, ज्येष्ठ कलाकार